Tripura Politics : ‘त्रिपुरा’मध्ये राजकीय भूकंप, मुख्यमंत्री बिप्लब देब यांचा राजीनामा - पुढारी

Tripura Politics : ‘त्रिपुरा’मध्ये राजकीय भूकंप, मुख्यमंत्री बिप्लब देब यांचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tripura Politics : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिप्लब कुमार देव यांच्या अचानक राजीनाम्याच्या वृत्ताने राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्रिपुरामध्ये बिप्लब कुमार देव यांची प्रतिमा भाजपचे मोठे नेते अशी आहे. 2018 मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत बिप्लब देब हा राज्यातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा होता. त्यांनी राज्यातील डाव्यांची 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपला सत्तेवर आणले होते. पण आज त्यांनी राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे.

देव यांनी कोणत्या कारणांसाठी राजीनामा दिला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्रिपुरामध्ये पुढील वर्षी म्हणजे मार्च 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्रिपुरामध्ये 60 सदस्यांची विधानसभा आहे. 2018 मध्ये भाजपने 43 टक्के मतांसह राज्यात प्रथमच 36 जागा जिंकून सरकार स्थापन केले आणि तेथील प्रदीर्घ काळातील डाव्यांची सत्ता संपुष्टात आणली. त्या निवडणुकीत डाव्या पक्षांना केवळ 16 जागा मिळाल्या होत्या. (Tripura Politics)

बिप्लब कुमार देब यांच्या राजीनाम्यावर तृणमूल काँग्रेसने खरपूस समाचार घेतला आहे. तृणमूलने ट्विट करून म्हटले आहे की, ‘बिप्लब कुमार देब यांनी जनतेचा अपेक्षा भंग केला आहे. ते लोकांच्या आकांक्षांवर खरे उतरण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांनी आधीच खूप नुकसान केले आहे. त्यामुळेच त्यांच्या निष्क्रियतेवर पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वही नाराज झाले.’

त्रिपुरामध्ये तृणमूलच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप नेतृत्व अस्वस्थ झाल्याचेही बोलले जात आहे. (Tripura Politics)

 

Back to top button