Ketaki Chitale : केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्ट भोवली - पुढारी

Ketaki Chitale : केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्ट भोवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. केतकीवर राज्यातील विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, ठाण्यातून मोठी अपडेट समोर येत आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. एका मराठी वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता केतकी चितळेवर पुढे कोणती कारवाई होणार? की समज देऊन सोडून देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) ही आपल्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तिच्या पोस्टमध्ये नेहमी असभ्य भाषा आणि शिव्या पहायला मिळतात. अशा अनेक पोस्टमुळे ती अनेकदा चांगलीच ट्रोलदेखील झाली आहे, तसेच तिला अनेकांची टीकादेखील सहन करावी लागली आहे. आता तिने थेट राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना टार्गेट करत त्यांच्यावर असभ्य आणि अर्वाच्च शब्दांत टीका केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये एक काव्य लिहित अत्यंत खालच्या शब्दांत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

केतकी चितळे

केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक कविता पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सर्वच मर्यादा ओलांडल्याचे पहायला मिळते.

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll”

अशा स्वरुपाची शरद पवार यांची अत्यंत खालच्या शब्दांत निंदा करणारी व असभ्य भाषेचा वापर करण्यात आलेली कविता केतकी चितळे हिने पोस्ट केली आहे. सोबत या कविते खाली ॲडव्होकेट नितीन भावे असे ही कविता लिहिणाऱ्याचे नाव लिहिले आहे.

Back to top button