ठाकरे सरकारमधील ६ नेते, मंत्र्यांवर कारवाई सुरू : किरीट सोमय्या | पुढारी

ठाकरे सरकारमधील ६ नेते, मंत्र्यांवर कारवाई सुरू : किरीट सोमय्या

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे सरकारमधील सहा नेते आणि मंत्र्यांवर केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांची कारवाई सुरू असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शुक्रवारी दिली. दापोली न्यायालयात परिवहन मंत्री अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट, पुणे न्यायालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फसवणूक, यशवंत जाधव यांच्याविरोधात फसवणूक, किशोरी पेडणेकर, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि भावना गवळी यांच्याविरोधात कारवाई सुरू असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya)  हे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या गैरव्यवहारांची तक्रार करण्यासाठी दिल्ली येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नंदकिशोर चतुर्वेदीविरोधात केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. त्याच्या १५० हून बनावट कंपन्या आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचे चतुर्वेदीसोबत कोट्यावधी रूपयांचे मनी लाँडरिंग केल्याचा आरोप त्यांनी केला.

सचिन वाझे आणि इतरांकडून येणारा पैसा जिरवण्याचे काम चतुर्वेदी करत होता, असा दावा सोमय्या यांनी केला. चतुर्वेदी आता गायब असून त्याला मुख्यमंत्र्यांनीच तर लपवून ठेवले नाही ना ?, असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button