किशोर बरकाले
पुणे : राज्यात हळद पीक संशोधन, विकास तसेच त्याच्याशी संलग्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. हळद धोरणाबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्यात हे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही संस्था हिंगोली जिल्ह्यातील मौजे बोराळा, बसमत टी पॉइंट येथे अथवा इतर शासकीय विभागांच्या जागेवर स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्याला मसाला पिकांसाठीचे उत्कृष्ट केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे कृषी आयुक्तालयाने निश्चित केले आहे.
हळद लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकरी, प्रक्रियाकार तसेच निर्यातदारांना येणार्या अडचणी विचारात घेता महाराष्ट्र राज्याचे हळद संशोधन व प्रक्रिया धोरणनिश्चितीकरिता शासनाला सल्ला देण्यासाठी शासनाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे महाराष्ट्रातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा तयार करण्यात आला आहे. हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा सर्वसामान्यांच्या सूचनांकरिता कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जगातील हळदीखालील क्षेत्राचा विचार केल्यास मुख्य क्षेत्र भारतात आहे, जे 81 टक्के आहे. त्यानंतर चीन 7 टक्के, म्यानमार 4 टक्के, नायजेरिया 3 टक्के, बांगलादेश 3 टक्के, व्हिएतनाम 1 टक्का आणि श्रीलंका 1 टक्का, याप्रमाणे क्रम लागतो. 2020-21 मध्ये देशात महाराष्ट्र हे हळद पिकाखालील क्षेत्रानुसार प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. सुमारे 60 हजार 840 हेक्टरवर हळदीचे पीक घेतले जात असून, 12 लाख 16 हजार 975 मे. टन उत्पादन हाती आले आहे, तर सरासरी हेक्टरी उत्पादकता 20 मे. टन आहे.