

पुणे / हडपसर : पुढारी वृत्तसेवा
जागतिक महिला दिनानिमित्ताने शीतल महाजन- राणेने पॅरामोटर्सच्या साह्याने तिरंगा वेश एलएडी परिधान करून 5 हजार फुटांवरून स्कायडायव्हिंग केले.
हडपसर येथील पॅराग्लायडिंग सेंटरमधून शीतलने ही उडी मारली. यावेळी उद्योगपती विजय सेठी यांनी पॅरामोटर्सच्या पायलटची जबाबदारी पार पडली. हा विक्रम मंगळवारी (दि.8) रात्री सात पन्नास ते रात्री आठ वीस असा पंचवीस मिनिटांच्या अवधीत पार पडला. अशा प्रकारे पॅरामोटरमधून पॅराजम्पिंग करणारी ती पहिलीच भारतीय महिला असून, रात्रीच्या वेळेस पँराजम्पिंगचाही हा पहिलाच विक्रम आहे.
शीतल म्हणाली की, सर्वसामान्य कुटुंबातून स्कायडायव्हिंग खेळात पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धांत मी सहभागी झाले आहे. आतापर्यंत माझ्या नावावर 18 राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत. जगातील सात खंडांत स्कायडायव्हिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे. याची दखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी माझा सबिहा गोकसेन सुवर्णपदक देऊन सन्मान केला आहे.
सेठी हे एक पॅरामोटर इन्स्ट्रक्टर असून आम्ही जमिनीपासून आकाशात पाच हजार फुटांवर गेलो. त्या ठिकाणी पॅरामोटरमधून मी बाहेर पडत आकाशात झेप घेतली. जमिनीच्या दिशेने मी वेगात येत असतानाच पाच हजार उंचीवर मी पॅराशूट उघडले. या विक्रमाची नोंद लिम्का व गिनिज बुकात होईल, या उपक्रमासाठी ग्लायडिंग सेंटरचे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभले,'असेही तिने सांगितले.