ट्रकने कारला धडक दिल्याने आईसह मुलगी जखमी | पुढारी

ट्रकने कारला धडक दिल्याने आईसह मुलगी जखमी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पोपले वस्तीसमोर कारला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने धडक दिली. यात कारमधील आईसह मुलगी जखमी झाली. या घटनेत कारचे 2 लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सरवनन के. कुप्पुसामी (वय 42, रा. अरो, जि. धर्मपुरी, राज्य तामिळनाडू) या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विजयसिंग शामसिंग पत्तार (वय 56, रा. बरटगी, ता. तिकोटा, जि. विजापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

यात म्हटले आहे की, 26 जून रोजी 6 वाजण्याच्या सुमारास विजयसिंग पत्तार व त्यांची पत्नी, मुलगी व जावई हे चौघे केए 04 एमटी 9762 या क्रमांकाच्या कारमधून तुळजापूरहून सोलापूरकडे येत होते. ते तुळजापूर रोडवरील पोपले वस्तीजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या टीएन 34 एक्स 6262 या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात विजयसिंग यांच्या पत्नीस व मुलीस मार लागून त्या दोघीही जखमी झाल्या. या फिर्यादीवरून ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास जोडभावी पोलिस करत आहेत.

Back to top button