सोलापूर : गट, गणांची अंतिम प्रभाग रचना आज होणार प्रसिद्ध | पुढारी

सोलापूर : गट, गणांची अंतिम प्रभाग रचना आज होणार प्रसिद्ध

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रारूप आराखड्यावर विभागीय आयुक्‍तांनी शिक्‍कामोर्तब केले आहे. अंतिम गट आणि गण रचनेचा आराखडा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची महिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली.

राज्य निवडणूक आयेागाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या 77 गटासाठी तर 11 पंचायत समितीच्या 154 गणासाठी अंतिम गट आणि गण रचनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गेल्या तीन, चार महिन्यापासून यावर निवडणूक विभागाचे काम सुरु होते.त्यासाठीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. त्याला जाहीर प्रसिद्धीही देण्यात आली होती. त्यावर सूचना आणि हरकती ही मागविण्यात आल्या होत्या. त्याची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे घेण्यात आली होती. त्यानुसार आता अंतिम गट आणि गण रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला 27 जून रोजी प्रसिद्धी देण्यात येणार आहे. ही गट आणि गण रचना अंतिम असणार आहे. त्यामुळे या आराखड्यानुसारच निवडणूका पार पाडल्या जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

Back to top button