

मुंबई : पुढारी ऑनलाईन; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज गुरुवारी देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो अजित पवार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics News)
अजित पवार बंडखोरी करत भाजप- शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्या या निर्णयाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले होते. अजित पवार यांनी केलेले बंड हे अत्यंत धाडसी आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे आपण स्वागत करतो. पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे आपण अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया आठवले यांनी यापूर्वी दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्याचा आणि देशाचा विकास होत राहील. पंतप्रधान मोदी चांगले काम करीत आहे. त्यामुळे त्यांना उगाच सतत विरोध करणे योग्य नाही, म्हणून अजित पवार अनेकदा पंतप्रधान मोदींबद्दल चांगले बोलत होते. त्यामुळे यावेळी अजित पवार यांनी सुयोग्य नियोजन करून केलेले बंड यशस्वी झाले. त्यांचा हा निर्णय धाडसी आहे.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत ओबीसी समाजाला महत्वाचे स्थान दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. पीएम मोदी हे ओबीसी समाजातून आले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन छगन भुजबळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असेही आठवले म्हणाले होते. (Maharashtra Politics News)
हे ही वाचा :