सीमाभागातील महामार्गांवर बंदोबस्त वाढविला : महाराष्ट्र पोलीसांना अलर्ट
नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कन्नड वेदिकेच्या कार्यकत्यांनी आज बेळगावमध्ये महाराष्ट्रातील सहा वाहनांची तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख मिलींद भारंबे यांनी सीमा मार्गासह राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुरू असताना जत तालुक्यातील सीमेलगत असलेल्या गावांमध्ये कन्नड वेदीका संघटनेचे झेंडे फडकले. त्यानंतर जत, अक्कोलकोट, सोलापुरातील ग्रामस्थांनी कनार्टक राज्यात जाण्याची भूमिका घेऊन कन्नड वेदीकेचे झेंडे हाती घेतले. जत तालुक्यात पाणी सोडून कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना बेळगावमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आला.
आज (दि.६ ) बेळगाव दौ-यावर असलेल्या कन्नड वेदिकेचे अध्यक्ष नारायण गैडा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सहा वाहनांची हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आली. याची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घेतली आहे. तातडीने राज्यातील सीमाभागासह सीमा भागातून जाणा-या महामार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख मिलींद भारंबे यांनी दिली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचेही भारंबे यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Eknath Shinde – Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर १३ जानेवारीला सुनावणी
- महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक्सवर दगडफेक (Video)
- Indonesia bans sex outside marriage | इंडोनेशियात नवीन कायदा, विवाहबाह्य संबंध ठेवल्यास एक वर्षाची शिक्षा, 'लिव्ह-इन'मध्ये राहणे हाही गुन्हा

