महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक्‍सवर दगडफेक (Video) | पुढारी

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या ६ ट्रक्‍सवर दगडफेक (Video)

बेळगाव पुढारी वृत्तसेवा : कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांकडून महाराष्ट्र पासिंग असणाऱ्या मालवाहू 6 ट्रक्सवर दगडफेक केल्याची घटना नुकताच घडली आहे. बेळगाव जवळील पुणे- बंगळूर महामार्गावरील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर सदर घटना घडली आहे. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

महामार्गावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र पासिंगच्या ट्रक्सवर दगडफेक करण्यात आली आहे. जवळपास ६ ट्रक्‍सवर दगडफेक करून शाहीफेक करण्यात आली आहे. यामुळे सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. न्यायप्रविष्‍ट प्रकरणाबाबत अशा घटना घडत असतील तर हे निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्‍ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

दरम्यान, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा आज (मंगळवार) होणारा बेळगाव दौरा रद्द झाला असला, तरी कर्नाटक सरकारने खबरदारी घेतली असल्‍याचे दिसून येत आहे. कर्नाटकच्या पोलिसांकडून कर्नाटक-महाराष्ट्रच्या कोगनोळी सीमेवर खबरदारी घेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी सुरू ठेवली आहे. महाराष्‍ट्राच्या मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश द्यावयाचा नाहीच, यावर कर्नाटक सरकार ठाम आहे. याचाच एक भाग म्हणून खबरदारी घेत सीमाभागातील २१ तपासणी नाक्यांवर खडा पहारा ठेवला आहे.

सीमाभागातून जाणा-या महामार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविला

बेळगाव दौ-यावर असलेल्या कन्नड वेदीकेचे अध्यक्ष नारायण गैडा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सहा वाहनांची हिरेभाग टोलनाक्यावर तोडफोड करण्याची गंभीर घटना घडली. याची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घेतली आहे. तातडीने राज्यातील सीमाभागासह सीमा भागातून जाणा-या महामार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख मिलींद भारंबे यांनी दिली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचेही भारंबे यांनी सांगितले.

मंत्र्यांचा दौरा रद्द

दरम्यान, यातूनच जर मंत्री बेळगावला येणार असतील तर, कोणत्याही परिस्थितीत कोगनोळी सीमेवर कर्नाटक हद्दीत महामार्ग रोखण्याची तयारीही पोलीस प्रशासनाने केली आहे. सीमाप्रश्न ही न्यायप्रविष्ट बाब आहे. असे असले तरी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांचा आजचा (मंगळवार) बेळगाव दौरा निश्चित होता, मात्र सीमा भागात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे मंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा

सीमाप्रश्नावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यान सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात प्रवेश करू नये. सरकारी सूचना असतानाही त्यांनी प्रवेशाचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तूर्तास येऊ नये असे लेखी कळवले आहे. पण, त्यांनी बेळगावात प्रवेशाचा हट्ट धरला आहे. हे योग्य नाही. कुणालाही कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असल्याची जाण आपल्याला आहे. पण, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय केले जात असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

सीमाप्रश्नी कायदेशीर लढा देण्याची तयारी कर्नाटक सरकारने केली आहे. त्याआधी कोणत्याही कारणास्तव येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही. दोन्ही राज्यांतील लोक सौहार्दतेने राहत आहेत. शांतता भंग होईल अशा घटनांवर लक्ष ठेवण्याची सूचना पोलिस अधिकार्यांना दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करुन काही खबरदार्या घेण्याची सूचनाही दिल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.

 

Back to top button