LokSabha Elections 2024 | सोलापूर : भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी

LokSabha Elections 2024 | सोलापूर : भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी
Published on
Updated on

सोलापूर लोकसभा मतदार संघात (LokSabha Elections 2024) महाविकास आघाडीच्या उमेदवाराची निश्चिती होऊन त्यांचा प्रचारही सुरू झाला. मात्र, विजयाचा खूप आत्मविश्वास आहे असे सांगणार्‍या भाजपमध्ये खंडीभर इच्छुक आहेत, तरी सोलापूरचा उमेदवार ठरेना, अशी सद्यस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections 2024) निमित्ताने भाजपला सोलापूर जिल्हा जणू जड चालल्याची चिन्हे आहेत. माढा मतदार संघात मोहिते-पाटील घराण्याचा विरोध पत्करून त्याठिकाणी विद्यमान खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे बिथरलेले मोहिते-पाटील समर्थक व नेत्यांना शांत करण्यासाठी पक्षाने संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजनांना पाठवले. त्यांनी मोहिते-पाटलांच्या घरी जाऊन त्यांचे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या घराबाहेर जमलेल्या मोहिते-पाटील समर्थकांना समजावणे त्यांना जड गेल्याचे दिसून आले.

या ठिकाणाहून उमेदवारी मिळाली, की विजय निश्चित असे भाजप इच्छुकांना वाटत असल्याने त्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसर्‍या बाजूला पक्षश्रेष्ठींना याचा अंदाज आहे, की गत दोन्ही टर्ममध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कौल देऊनही सोलापूरमध्ये म्हणावी तशी विकास कामे झालेली नाहीत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकप्रक्षोभाचा फटका बसू शकतो.

दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीकडून सोलापूर शहर मध्यच्या आ. प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी जोरदार प्रचारारंभ केला आहे. स्वतःच्या तीन टर्मच्या आमदारकीच्या काळात आ. प्रणिती यांनी भरपूर कामे केल्याची सोलापूरकरांची भावना आहे. त्यामुळे समोर आ. प्रणितीसारखा दमदार उमेदवार असल्यास आपल्याला त्यापेक्षा तगडा उमेदवार द्यावा लागेल, याची भाजप नेत्यांना कल्पना आहे. त्यामुळे सध्या या पक्षाकडे खंडीभर इच्छुक असले तरी कोणाला उमेदवारी द्यायची याविषयी अद्याप पक्षश्रेष्ठींना निर्णय घेता आला नसल्याचे दिसते.

भाजपचे इच्छुक उमेदवार

विद्यमान खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी खा. शरद बनसोडे, माजी खा. अमर साबळे, माळशिरसचे आ. राम सातपुते, माजी नगरसेविका संगीता जाधव. पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे.

धक्कातंत्राची शक्यता

खूपजण इच्छुक असूनही अद्यापपर्यंत भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही. यामागे भाजपची काही रणनीती असू शकते, अशी चर्चा आहे. कदाचित भाजप ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत एकदम नवेकोरे नाव जाहीर करू शकेल, अथवा एखाद्या माजी सनदी अधिकार्‍यालाही संधी देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news