पवार, ठाकरेंनी विश्वास गमावला; प्रकाश आंबेडकर यांची टीका | पुढारी

पवार, ठाकरेंनी विश्वास गमावला; प्रकाश आंबेडकर यांची टीका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या जागांपैकी सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसा प्रस्तावच ‘वंचित’ने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्राद्वारे पाठवला आहे. ‘वंचित’च्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार देणे व बैठकीतील असमान वागणुकीमुळे शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे, अशी टीकाही ‘वंचित’चे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी ‘वंचित’ला वगळून चर्चा सुरू ठेवल्याने संतापलेल्या आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना पत्र लिहिले आहे. ते पत्र ‘वंचित’ने ‘एक्स’ वर जाहीर केले. या पत्रात आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे, अशी तक्रार आंबेडकर यांनी पत्रात केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा-फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे हा आहे. या विचाराने मी महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला वंचित आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या पसंतीच्या या सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल, अशी ग्वाही आंबेडकर यांनी दिली आहे. हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

‘मविआ’त 15 जागांवरून वाद

दरम्यान, महाविकास आघाडीने आम्हाला तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. तो आम्ही फेटाळून लावला आहे, असे सांगत राजकारणात सकारात्मक असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत, असे आंबेडकर म्हणाले. आम्ही कोणालाही सोडलेले नाही. आम्ही काँग्रेससंदर्भातील भूमिका मांडली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबतची भूमिका अजून मांडलेली नाही, असे आंबेडकर यांनी अकोल्यात बोलताना सांगितले. महाविकास आघाडीत 15 जागांवरून अजूनही भांडण आहे. त्यांच्यात जागावाटप होत नाही. त्यामुळे वंचित आघाडीला बदनाम करणे योग्य नाही. महाविकास आघाडीसोबतच्या युतीसाठी आमचे दरवाजे शेवटपर्यंत उघडे आहेत. आमचा कोणी विश्वासघात केलेला नाही आणि आम्ही कोणाचाही विश्वासघात केलेला नाही, असेही आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Back to top button