Lok Sabha elections 2024 | शिंदे गटाला मिळणार १३ ते १४ जागा | पुढारी

Lok Sabha elections 2024 | शिंदे गटाला मिळणार १३ ते १४ जागा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला एक-दोन दिवसांत जाहीर होणार असून, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संपूर्ण विश्वास व्यक्त करीत उमेदवार ठरविण्याचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले. तसेच जागावाटपासंदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून होणार्‍या वक्तव्यांवरून आमच्या मतदारसंघांतील वातावरण दूषित होत असल्याची चिंता शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मंगळवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, नाराज खासदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असून, विद्यमान खासदारांना प्राधान्य देत शिवसेनेला 13 ते 14 जागा मिळतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आल्याचे समजते. (Lok Sabha elections 2024)

भाजपने काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटकपक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपकडून दावा ठोकण्यात आल्याने विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्ये केली जात असल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, सदाशिव लोखंडे आदी खासदार उपस्थित होते. या खासदारांकडून मतदारसंघांतील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली. काही जागा भाजपला सोडल्या जाणार असून, उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा विरोधकांकडून सुरू झाल्याने महायुतीबाबत दूषित वातावरण निर्माण होत आहे. त्याचा फटका महायुतीला बसू शकतो, अशी चिंता अनेक खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. त्यावेळी विद्यमान खासदारांना तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्याचबरोबर शिवसेनेला 13 ते 14 जागा मिळतील, असे सांगितल्याचे समजते.

याबाबत खासदार राहुल शेवाळे म्हणाले, खासदारांची कुठेही नाराजी नाही. त्यांनी संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यांवर व्यक्त केला आहे. उमेदवारी जाहीर करण्याचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले. जोपर्यंत महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये, अशा सूचना महायुतीच्या नेत्यांना द्याव्यात, असे सर्व खासदारांकडून मुख्यमंत्र्यांना सुचवण्यात आले. (Lok Sabha elections 2024)

Back to top button