Unmesh Patil Shiv Sena UBT | ठाकरेंची मोठी खेळी! उन्मेष पाटील यांच्या हाती बांधले शिवबंधन | पुढारी

Unmesh Patil Shiv Sena UBT | ठाकरेंची मोठी खेळी! उन्मेष पाटील यांच्या हाती बांधले शिवबंधन

पुढारी ऑनलाईन : भाजपची साथ सोडत जळगाव जिल्ह्यातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज बुधवारी (दि.३) ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधून घेतले. त्यांनी त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही आज ठाकरे गटात प्रवेश केला. (Unmesh Patil Shiv Sena UBT)

दरम्यान, त्याआधी उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्याकडे आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे दिला.

जळगावचे खासदार उन्मेष पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना परिवारात प्रवेश करीत आहेत, अशी अधिकृत घोषणा खासदार संजय राऊत यांनी X वर पोस्ट करत केली होती. त्यानुसार त्यांचा आज पक्षप्रवेश पार पडला.

कार्यकर्ता म्हणून ठाकरे गटात प्रवेश- उन्मेष पाटील

मी उमेदवारीसाठी अथवा खासदार होण्यासाठी नाही, तर एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मान-सन्मानासाठी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज नाही. आमची लढाई आत्मसन्मानासाठी आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. बदल्याचे राजकारण वेदना देणार असल्याचेही ते म्हणाले.

सत्ता जिथे असते तिथे लोक जातात. पण सत्ता आणण्यासाठी तुम्ही आलात. याचा मला अभिमान आहे. प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस पाटील यांनी दाखवले, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले आहे. पाटील यांच्याऐवजी भाजपने जळगावातून स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उन्मेष पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, पाटील यांनी आज बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून उन्मेष पाटील नाराज होते. वाघ यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी पक्षाचा कार्यक्रम अथवा प्रचाराला उपस्थिती लावली नसल्याची चर्चा होती. भाजपकडून पाटील यांच्या मनधरणीचा प्रयत्न करण्यात आला. पण तोपर्यंत पाटील यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधून घेतले.

जळगावात लोकसभा निवडणूक अधिक रंगतदार होणार- राऊत

जळगावात शिवसेनेचाच खासदार निवडून येणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव लोकसभा निवडणूक अधिक रंगतदार होणार असून शिवसेनेला विजयाच्या जवळ घेऊन जाणार आहे. जळगावात शिवसेना मजबुतीने पुढे जाईल आणि जळगावातून प्रथमच शिवसेनेचा खासदार निवडून संसदेत जाईल, असा दावाही राऊत यांनी केला.

ऐनवेळी उमेदवार बदलला अन्….

२०२९ मधील लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवरकर यांचा साडेचार लाख मताधिक्क्याने पराभव केला होता. २०१९ मध्ये भाजपने सुरुवातीला स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण नंतर त्यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना जळगावमधून भाजपने उमेदवारी दिली होती.

हे ही वाचा :

 

Back to top button