Electoral Bonds | ‘लॉटरी किंग’, ‘ED टार्गेट’! कोण आहेत सँटियागो मार्टिन?, ज्यांनी राजकीय पक्षांना दिली सर्वाधिक १,३६८ कोटींची देणगी

Electoral Bonds | ‘लॉटरी किंग’, ‘ED टार्गेट’! कोण आहेत सँटियागो मार्टिन?, ज्यांनी राजकीय पक्षांना दिली सर्वाधिक १,३६८ कोटींची देणगी

पुढारी ऑनलाईन : निवडणूक आयोगाने गुरुवारी इलेक्टोरल बाँडस्‌चा (Electoral Bonds) संपूर्ण डेटा आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. ७६३ पानांच्या २ याद्या अपलोड करण्यात आल्या असून, एका यादीत बाँडस्‌ खरेदी करणाऱ्यांची, तर दुसऱ्या यादीत राजकीय पक्षांनी वटविलेल्या रकमेबद्दलची माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला १५ मार्चपर्यंत ही माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. (Who is Santiago Martin?)

इलेक्टोरल बाँडस्‌च्या माध्मयातून राजकीय पक्षांना देणाऱ्या यादीत 'लॉटरी किंग', उद्योजक आणि केंद्रीय एजन्सींच्या रडावर असलेले सँटियागो मार्टिन यांच्या फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी दिली आहे.

मार्टिन यांच्या फर्मने २०१९-२०२४ दरम्यान इलेक्टोरल बाँडस्‌च्या (Electoral Bonds) माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वाधिक १,३६८ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांना लॉटरी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून बेकायदेशीर आर्थिक नफा मिळवल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या डेटाच्या दोन संचानुसार, कोणी कोणत्या पक्षाला देणगी दिली हे निश्चित झालेले नाही.

कोण आहेत मार्टिन सँटियागो?

सँटियागो मार्टिन यांनी डिसेंबर १९९१ मध्ये स्थापन झालेल्या फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणी कोईम्बतूर येथे केली होती. मार्टिन सँटियागो यांच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी ट्रेडिंग सुरु केले. काही वर्षांमध्ये त्यांनी देशभरात लॉटरी व्यवसायाचा विस्तार केला. त्यांचा व्यवसाय संपूर्ण देशभरात पसरलेला आहे. विशेषतः दक्षिणेत मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्यवसायाचे जाळे आहे. त्यांनी सिक्कीम, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि म्यानमारमध्येही त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.

लॉटरी व्यतिरिक्त मार्टिन यांचा रिअल इस्टेट, बांधकाम, अल्टरनेटिव्ह एनर्जी, व्हिज्युअल मीडिया एंटरनेटमेंट, वस्त्रोद्योग, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य सेवा, शिक्षण, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान, मालमत्ता विकास, कृषी, ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि बांधकाम साहित्य या क्षेत्रात व्यवसाय आहेत.

त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे, "बिझनेस वर्ल्ड आणि इकॉनॉमिक टाइम्ससह अनेक वृत्तपत्रांतील लेख, बिझनेस मॅगॅझिन्स आणि अहवालांतून त्यांचा भारतातील सर्वात मोठे वैयक्तिक करदाता म्हणून उल्लेख केला आहे. ते दरवर्षी एकटे १ अब्ज रुपयांचा कर भरतात."

"त्यांच्या रौप्यमहोत्सवी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सँटियागो मार्टिन आणि त्यांच्या कुटुंबाला होली फादर पोप बेनेडिक्ट XVI यांच्याकडून आशीर्वाद मिळाले होते," असा दावा त्यांच्या वेबसाइटने केला आहे.

मार्टिन यांच्यावरील आरोप आणि तपास

फ्यूचर गेमिंग आणि मार्टिनची सध्या अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागासह अनेक केंद्रीय एजन्सीकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, मार्टिन यांच्यावर २००७ पासून सीबीआयचे गुन्हे दाखल आहेत.

द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार, २०१५ पर्यंत मार्टिन यांचे नाव कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात व्यापलेल्या लॉटरी व्यवसाय घोटाळ्यांत संशयित आरोपी म्हणून पुढे आले होते.

२००० च्या दशकाच्या सुरुवातीस मार्टिन हे द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाच्या जवळचे मानले जात होते. २०११ मध्ये त्यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या स्क्रिप्टवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना एका कथित जमीन हडप प्रकरणात त्यांना ऑगस्ट २०११ मध्ये अटक करण्यात आली होती.

२०१९ मध्ये ईडीने मार्टिन यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू केली होती. त्यांच्यावर आरोप होता की कंपनी आणि तिच्या उपवितरकांनी सिक्कीममध्ये न विकलेली लॉटरी तिकिटे बेकायदेशीरपणे ठेवण्यासाठी गुन्हेगारी कारस्थान रचले होते. जी तिकिटे विकली गेलेली नाहीत, त्यावर ९१० कोटी रुपये मिळवण्यासाठी सर्वोच्च बक्षिसांचा दावा केला होता.

त्यांच्या चौकशीचा एक भाग म्हणून एप्रिल २०२२ मध्ये ४०९.९२ कोटी रुपयांची, जुलै २०२२ मध्ये १७३ कोटी रुपयांची आणि मे २०२३ मध्ये ४५७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

ऑक्टोबर २०२३ मध्ये आयकर विभागाने कोईम्बतूरमधील मार्टिन यांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते. एप्रिल २०२३ आणि सप्टेंबर २०२२ मध्ये मार्टिन आणि त्यांचा जावई आधव अर्जुन यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती.

ETV Bharat च्या वृत्तानुसार, ९ मार्च २०२४ रोजी तामिळनाडूमधील कथित वाळू उत्खननाच्या प्रकरणात ईडीने आधव अर्जुन यांच्या १० ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर छापे टाकले होते. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२४ मध्ये अर्जुन यांची दलित राजकीय संघटना विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK) चे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news