

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ पक्ष चिन्ह मिळाले. परंतु लक्षद्वीपमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षचिन्ह म्हणून अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही. संबंधित उमेदवाराला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ चिन्ह दिले. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये मात्र घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिलला पार पडणार आहे. लक्षद्वीपमध्येही पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. लक्षद्वीपमध्ये युसूफ टी पी हे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत.
चिन्ह आदेश परिच्छेद १० नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो. अजित पवार गटाने २४ मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना २० मार्चला निघाली. दरम्यान, एक दिवस उशीर झाल्याने पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ चिन्ह मिळणार नाही. पहिल्या टप्प्यातच लक्षद्वीप लोकसभेची निवडणूक येत असल्याने अजित पवारांना घड्याळ चिन्ह मिळणार नाही.
हेही वाचा :