

Research On Gossip Explained in Marathi
मुंबई : आमच्या ऑफिसमधला तो आयटीमधला मंगेश.... तुला माहितीये त्याचं काय झालं.... ऑफिसमध्ये कुटाळक्या भरलेल्या गप्पा म्हणजेच गॉसिप्सचा प्रत्येकजण कधीना कधी हिस्सा राहिलेला असतोच. ऑफिसपासून ते मित्रमंडळी ते अगदी कुटुंबातही सर्रास गॉसिप्स सुरू असतात... आता काहींना यातून समाधान मिळते तर काहींना 'गॉसिप' करणं म्हणजे ही नकारात्मक बाब वाटते. एका रिसर्चमधून आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
मानव हा समाजशील प्राणी आहे हे आपण शाळेपासून वाचत आलोय. हेच सूत्र गॉसिपसाठीही लागू होतं. मित्र, त्यांचे मित्र, त्या मित्रांचे मित्र अशा शेकडो नात्याचं एक जाळे असते. गॉसिप पसरवण्याचं काम याच जाळ्यातून होत असते.
गॉसिप कसं पसरतं हे समजण्यासाठी ब्राऊन विद्यापीठाच्या संशोधकांनी एक प्रयोग केला. त्यांनी एका गटाचे निरीक्षण केले. यात साधारण 9 जण होते. ते कसे बोलतात, काय गप्पा मारतात यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. या अभ्यासातून जे समोर आलं ते खूपचं मजेशिर होते. गॉसिप करताना लोक दोन गोष्टी बघतात. एक म्हणजे कोण कोणाचा मित्र आहे आणि दुसरं म्हणजे समोरच्या व्यक्तीचे पद किंवा लोकप्रियता.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या व्यक्तीबाबत गॉसिप पसरवयाचे असते त्या व्यक्तीच्या मित्रासोबत सर्वात आधी कधीच गॉसिप केले जात नाही. आधी त्या व्यक्तीपासून बऱ्यापैकी लांबच्या मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबत गॉसिप शेअर केले जाते आणि सर्वात शेवटी त्या व्यक्तीच्या जवळच्या मित्र किंवा नातेवाईकाकडे गॉसिप शेअर केले जाते.
उदाहरणार्थ, अभय आणि सूरज हे जवळचे मित्र आहेत. तर सचिन, अभिजीत हे अभयचे फक्त मित्र आहेत. तर सचिन आधी अभिजीतसोबत गॉसिप शेअर करेल. अभिजीत त्याच्या मित्रांसोबत आणि सर्वात शेवटी अभिजीत सूरजला त्या गॉसिपबद्दल सांगेल.
गॉसिप हे चांगलं की वाईट?
गॉसिप करणे चांगले की वाईट याबाबत मतमतांतरे असू शकतात. एका दिग्गज इंग्रजी कांदबरीकाराच्या विधानाचा इथे संदर्भ देता येईल. त्यांनी म्हटलं होतं, माणसाची प्रतिष्ठा ही चलनासारखी असते तर गॉसिप हे सावट बनून ही प्रतिष्ठा उद्ध्वस्त करणारा खलनायक आहे.
गॉसिपला नकारात्मक छटा असली तरी आपण त्यांना पूर्णपणे चूक ठरवणंही योग्य नाही. ही एक कला आहे ज्याला आपण सोशल इंटेलिजन्स म्हणू शकतो. नातेसंबंध, प्रतिष्ठा/प्रतिमा निर्मितीमध्ये हेच सोशल इंटेलिजन्स महत्त्वाचे ठरते. समाजात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठीचे हे एक कौशल्य आहे, असं या अभ्यासकांनी म्हटले आहे.