

Martyr Ashish Kumar Sister Wedding :
सिरमौर जिल्ह्यातील आंजभोजच्या भरली गावचे सुपूत्र आशिष कुमार शहीद झाले होते. त्यांच्या मागे त्यांची बहीण आराधनाचा विवाह कसा होणार अशी चिंता होती. मात्र लष्करातील सेनेच्या जवानांनी आराधनाच्या भावाची भूमिका बजावली. त्यांनी आराधनाला लग्नात भावाची उणीव जाणू दिली नाही. अरूणाचलवरून शहीद आशिषच्या बटालियनमधील जवानांनी आराधनाच्या लग्नातील सर्व रिती-रिवाज पार पाडले.
अरुणाचल प्रदेशात 19 ग्रेनेडियर बटालियनमध्ये कार्यरत असताना, 27 ऑगस्ट 2024 रोजी 'ऑपरेशन अलर्ट' दरम्यान आशिष कुमार यांना वीरमरण आलं होतं. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद आशिष कुमार यांच्या रेजिमेंटचे जवान आशिषच्या बहिणीच्या लग्नाला भरली गावात पोहोचले. सैनिकांनी थेट भारतीय लष्कराच्या वर्दीत येऊन शहीद आशिषच्या बहिणीला वरमालेसाठी स्टेजपर्यंत आणले. हा क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि लोक भावूक होऊन या सैनिकांना पाहत राहिले.
यावेळी रेजिमेंटमधून आलेल्या जवानांनी गर्व आणि आदराने बहिणीला एक खास भेट दिली. त्यांनी शहीद प्रशंसा पत्र आणि एफडी भेट स्वरूपात दिली. तसेच, माजी सैनिक संघटनेनेही शगुन आणि स्मृतिचिन्ह बहिणीला दिलं. हा अनपेक्षित सन्मान पाहून नववधू आराधना हिने नम्र डोळ्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विवाहानंतर सैनिकांनी आणि माजी सैनिकांनी एकत्र येऊन बहिणीला सासरच्या घरी सोडण्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडली आणि मोठ्या भावाची भूमिका निभावली.
ग्रेनेडियर रेजिमेंटचे जवान आणि माजी सैनिक संघटना यांनी आपल्या या कृतीतून हे सिद्ध केले की, त्यांचे बंधुत्व शाश्वत आहे. शहीदांच्या कुटुंबीयांप्रती दाखवलेली ही संवेदनशीलताच खरी देशभक्ती आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले.