

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मानेतील आणि डोक्यातील कर्करोगाचा धोका आता एका रक्त चाचणीद्वारे दहा वर्षांपूर्वीच ओळखणे शक्य होणार आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) संबंधित कर्करोग ओळखण्यासाठी ‘एचपीव्ही-डीपसीक’ ही चाचणी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. या चाचणीमुळे रुग्णांचे लवकर निदान होऊन उपचार अधिक यशस्वी होऊ शकतात.
या चाचणीसंदर्भातील संशोधन ‘जर्नल ऑफ द नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. आजवर अशा प्रकारच्या एचपीव्ही-संबंधित कर्करोगांसाठी कोणतीही स्क्रिनिंग चाचणी उपलब्ध नव्हती. एचपीव्ही-डीपसीक ही लिक्विड बायोप्सी तंत्रावर आधारित रक्त चाचणी वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठी प्रगती मानली जात आहे. या चाचणीद्वारे एचपीव्ही संबंधित कर्करोगातील डीएनए पातळी रक्तात अगदी सुरुवातीच्या अवस्थेत शोधता येते.
ही चाचणी विकसित करताना 56 रक्त नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 28 नमुने अशा व्यक्तींचे होते ज्यांना पुढे कर्करोग झाला, तर उर्वरित 28 नमुने आरोग्यदायी व्यक्तींचे होते. त्याच्या निकालांनुसार कर्करोग झालेल्या 28 पैकी 22 नमुन्यांमध्ये एचपीव्ही ट्यूमर डीएनए आढळले. या चाचणीची अचूकता उच्च असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. सर्वात आधी मिळालेला पॉझिटिव्ह नमुना हा निदानापूर्वी तब्बल 7.8 वर्षांपूर्वी घेतलेला होता. तसेच संशोधकांनी मशिन लर्निंगचा वापर करून या चाचणीची कार्यक्षमता आणखी वाढवली आहे.
एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) हा एक डीएनए व्हायरस आहे जो मानवी शरीरातील पेशींवर परिणाम करतो. हा विषाणू मुख्यतः त्वचा, तोंड, घसा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींना संसर्ग करतो. जेव्हा तो शरीरात दीर्घकाळ राहतो, तेव्हा तो त्या पेशींच्या जनुकांमध्ये बदल घडवतो. या बदलांमुळे पेशींचे नियंत्रण सुटून त्या अनियंत्रित वाढू लागतात आणि त्यातून ट्यूमर तयार होतो. ‘एचपीव्ही-डीपसीक’ या चाचणीमुळे अशा विषाणूमुळे होणार्या कॅन्सरचे निदान लवकर आणि अधिक अचूकपणे होण्यास मदत होईल.