

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्हा तिघांना कारागृहात जावे लागले तरी 'डर्टी डझन' घोटाळे लॉजिकल शेवटापर्यंत घेवून जावू. यशवंत जाधवांप्रमाण इतर चौघांचीही भ्रष्टाचाराची कागदपत्रे असून विविध एजेन्सीने त्याचा पाठपुरावा सुरू केला असल्याचा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिला. मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे.
पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा तसेच, यशवंत जाधव यांनी शेल कंपनीत आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर आयकर विभागाकडून ही धाड टाकण्यात आली आहे. जाधव यांच्यावरील कारवाईनंतर आणखी चौघांवर कारवाई होईल, असे सोमय्या म्हणाले. यावेळी त्यांनी जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही निशाणा साधला.
जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधवांनी आमदारकीचा फॉर्म भरताना कोट्यवधी रुपयांची माहिती लपवली होती. पंरतु, ती माहिती आयकर विभागाच्या हाती लागली. निवडणुकीचा फॉर्म भरतांना मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते.अशात निवडणुकीचे फॉर्म भरणाऱ्यांचे अर्ज आयकर विभागाकडे पाठवले जातात. त्यानुसार,आयकर विभाग याची तपासणी करुन निवडणूक विभागाला एक अहवाल देतो आणि त्यानंतर कारवाई होते, असे सोमय्या म्हणाले. यामिनी व यशवंत जाधव यांच्या प्रकरणात प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीमुळे समोर आले. ही कंपनी अधिकृतरित्या बंद म्हणून घोषित करण्यात आली. या कंपनीच्या द्वारे यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
उदयशंकर महावार गांधी परिवाराचा हवाला ऑपरेट आहे. सोनिया गांधी परिवाराचे तो मनी लॉन्ड्रिंग करतो. गांधी परिवारानेच ठाकरे परिवाराची महावार याच्यासोबत ओळख करुन दिली असावी, असा गंभीर आरोप करीत सोमय्या यांनी ठाकरे आणि गांधी कुटुंबियांना चिमटे काढले. या ओळखीनंतर ठाकरेंनी महापालिका फंड कलेक्टर यशवंत जाधवची भेट घालून दिली असावी. जाधव याचा ऑपरेटर देखील उदयशंकर महावार आणि नॅशनल हेरॉल्ड ज्या वर्तमान पत्राच्या ट्रस्टी, पार्टनर सोनिया गांधी, राहुल गांधी आहेत त्याचे मनी लॉन्ड्रिंगचे काम महावारने केले,असा आरोपही सोमय्या यांनी केला.
प्रधान डिलर्स या शेल कंपनीकडून जाधव कुटुंबियांनी १५ कोटी रोख देवून धनादेश घेत त्यावर दुसरी आणि तिसरी कंपनी तयार केली.यशवंत जाधव हे मुख्य फंड कलेक्टर आहेत. १५ कोटींपैकी काही रक्कम यूएईला पाठवण्यात आले. यासंबंधी आयकर विभागाने निवडणूक आयोगाला एक अहवाल पाठवला असल्याचेही सोमय्या म्हणाले.
ही कारवाई एवढ्यावरच थांबवणार नाही, हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहिती आहे.म्हणूनच पुन्हा संजय राऊत आरडा-ओरडा सुरू करणार. किरीट, नील आणि मेघा सोमय्यांना तुरूंगात टाका,अशी मागणी करतील. पंरतु, मुख्यमंत्री, शरद पवार आणि गृहमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत किरीट,नील सोमय्यांचा भ्रष्टाचार सापडला नाही.एकही कागदपत्र नाही. अशात काही करू शकत नाही, असे सांगणाऱ्या पोलीस आयुक्तांना बदलीची धमकी देण्यात आली. किमान एक महिना जामीन मिळणार नाही,असा गुन्हा नील वर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा सोमय्या यांच्याकडून करण्यात आला.