भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाचा तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव झाला. त्यामुळे पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने मालिकेत १ – १ अशी बरोबरी केली. दरम्यान, मालिकेतील चौथी कसोटी ओव्हलवर २ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाने आपल्या संघात प्रसिद्ध कृष्णा या वेगवाग गोलंदाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
बीसीसीआयने आज ( दि. १ ) याची माहिती दिली. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'भारतीय वरिष्ठ संघाच्या निवडसमितीने संघ व्यवस्थापनाच्या विनंतीनुसार भारतीय संघात चौथ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे.'
बीसीसीआय प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणते की, 'प्रसिद्ध कृष्णा स्टँड बाय खेळाडू म्हणून संघासोबतच आहे आणि तो दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच संघासोबत सराव देखील करत आहे. येणारी चौथी कसोटी २ सप्टेंबरपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे.'
विराट सेनेच्या तोफखान्यात प्रसिद्ध कृष्णाचा समावेश झाल्यामुळे आता ताफ्यातील वेगवान गोलंदाजांची संख्या सात झाली आहे. यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि आता प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.
भारतासाठी ओव्हल कसोटी म्हत्वपूर्ण आहे. हेडिंग्ले कसोटीतील मानहानीकारक पराभव पुसून टाकण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाला ओव्हल कसोटी जिंकणे महत्वाचे आहे. इंग्लंडने हेडिंग्ले कसोटी एक डाव आणि ७६ धावांनी जिंकली होती. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला ७८ धावात गुंडाळले होते.
दरम्यान, भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज आर. अश्विन देखील इंग्लंड दौऱ्यावर अजूनपर्यंत एकही सामना खेळलेला नाही. संघात रविंद्र जडेजा हा एकमेव फिरकी अष्टपैलू म्हणून खेळत आहे. आता संघात प्रसिद्ध कृष्णाचा समावेश झाल्यामुळे विराट कोहली आपल्या चार वेगवान गोलंदाज घेऊन खेळण्याच्या रणनीतीवर कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.
रोहित शर्मा, केएल. राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्सर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले, आज ती रणजी खेळते