लेहमध्ये फडकला १४०० किलोचा खादी तिरंगा

लेहमध्ये फडकला १४०० किलोचा खादी तिरंगा

जम्मू ; अनिल साक्षी : लडाखची राजधानी लेहमध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने खादीचा देशातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज (तिरंगा) फडकविण्यात आला आहे. 225 द 150 फूट आकाराच्या या ध्वजाचे वजन जवळपास 1400 किलो जास्त आहे. हा तिरंगा तयार करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला.

लडाखच्या उपराज्यपालांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांचीही उपस्थिती होती. प्रमुख मान्यवर आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी ध्वजाला सलामी दिली. लेहमधील झास्कर टेकडीवर तो फडकाविण्यात आला. हा तिरंगा खादी विकास मंडळ आणि मुंबईतील एका छपाई कंपनीने संयुक्तपणे बनविला आहे. झास्कर टेकडीवर अभियंता रेजिमेंटच्या 150 जवानांनी तिरंगा खांद्यावर उचलून नेला. शिखर गाठण्यासाठी दोन तास लागले.

लडाखमध्ये पर्यटकांना थेट एलएसीपर्यंत जाण्याची मूभा

केंद्रशासित प्रदेश लडाखला भेट देऊ इच्छिणार्‍या पर्यटकांना आता पाकिस्तान-चीनला लागून असलेल्या एलएसीपर्यंत जाण्याची मूभा देण्यात आली आहे. याबरोबरच पर्यटकांना जगातील सर्वोच्च रणभूमी असलेल्या सियाचीनच्या बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंगही करता येईल.

उत्तुंग पर्वतराजीत वसलेल्या या क्षेत्राचा कोपरा न कोपरा धुंडाळू इच्छिणार्‍यांसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. लडाख मध्ये रँचोची शाळा, पॅगाँग सरोवरासारखी प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याकडे बहुतांश पर्यटकांचा कल असतो. मात्र यात आता नवीन ठिकाणांची भर पडली आहे.

पूर्व लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन मध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र आता पर्यटकांना थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत (एलएसी) जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आता इनरलाइन परमिटची आवश्यकता नसेल. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. विदेशी पर्यटकांना मात्र परवानगी घेऊनच या भागात जाता येणार आहे.

सियाचीन ग्लेशियरच्या बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंगचा मार्गही पर्यटकांसाठी मोकळा झाला आहे. नुकतेच दिव्यांगांच्या एका गटाने कुमार पोस्टपर्यंत ट्रेंकचा आनंद लुटला.

भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या या सवलतीमुळे सामान्य पर्यटक एलएसीनजिक असलेल्या मान मराक ते त्यासगल मार्गे चुशूलपर्यंत जाऊ शकतील. शिवाय लेहमधील हानले आणि कारगिलमधील मुशकोह भागातही त्यांना मुक्तसंचार करता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news