मुंबई, पुढारी ऑनलाईन: माजी खासदार राजू शेट्टी याच्या विधानपरिषद सदस्यत्वाच्या मार्गात नियम आडवा येत असल्याचे समजते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. निवडणुकीत पराभूत झालेल्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करता येत नाहीत असे राज्यपालांनी सांगितले आहे.
याबाबत तथ्य तपासून माहिती घेत आहोत. खरोखर असा नियम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्या भेटीत १२ सदस्यांच्या यादीवर चर्चा झाली.
महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीतील काही नावांवर राज्यपालांना आक्षेप घेतला आहे.
यामध्ये एकनाथ खडसे, सचिन सावंत, प्रा. यशवंत भिंग, नितीन बानुगडे आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नावावर आक्षेप असल्याचे समोर आले आहे.
यातील एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी हे थेट भाजपला आव्हान देऊन बाहेर पडलेले नेते आहेत.
त्यामुळे त्यांच्या नावाला जोरदार विरोध आहे. राज्यपालांनीही नियमांचा आधार घेत या नावांवर आक्षेप नोंदवला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपशी केलेली आघाडी सोडून राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीशी घरोबा केला होता.
त्यावेळी त्यांना विधानपरिषद सदस्यत्वाचे आश्वासन दिले होते.
एकनाथ खडसे यांनीही देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
हे दोन्ही नेते मंत्रिपदाच्या शर्यतीतील आहेत. त्यामुळे या दोघांच्या आमदारकीला भाजपच्या एका गोटातून मोठा विरोध आहे.
राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन आल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत, असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे.
आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील,'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नक्कीच राजकीय दबाव आहे. त्यांनी तसे स्पष्ट सांगावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी सांगितले.
मंत्रिमंडळानं निर्णय घेतला, नावांची शिफारस केली की त्यावर स्वाक्षरी करण्याचं काम राज्यपालांचे आहे.
काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. ती सकारात्मक झाली आहे.
त्यामुळे राज्यपाल १२ जणांच्या यादीवर स्वाक्षरी करतील.
काही दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीवर तुटून पडत आहेत.
त्यांचा रोख विशेषत: पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे.
मुश्रीफ यांच्यावर त्यांनी थेट टीका केली. या दोघांतील कलगीतुरा रंगला होता.
त्यानंतर महाविकास आघाडीविरोधात त्यांनी काढलेला आक्रोश मोर्चा हे कशाचे निदर्शक आहे, याचा अर्थ आता राजकीय विश्लेषक लावत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर रविकांत तुपकर सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत गेले होते. मात्र, ते काही दिवसांत परतले.
त्यानंतर महाविकास आघाडीने सरकारने राजू शेट्टी यांचे नाव आमदारकीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रा. जालंदर पाटील यांच्यासह अन्य नेते नाराज झाले.
त्यांनी थेट टीका केली. मात्र, शरद पवार यांनी मागेपुढे नियमांचा आधार घेऊन नावे उडवली जाऊ शकतात, असे सांगत नाराजांची समजूत काढली होती. तरीही राजू शेट्टी यांचे विधानपरिषद सदस्यत्व दूरच आहे.