यूपीत पाचव्या टप्प्यासाठी घमासान

यूपीत पाचव्या टप्प्यासाठी घमासान

लखनौ : हरिओम द्विवेदी

उत्तर प्रदेशात बुधवारी एकीकडे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना दुसरीकडे या मतदारसंघाच्या शेजारील जिल्ह्यातच सत्ताधार्‍यांसह विरोधी नेत्यांच्या सभा सुरू होत्या. चौथ्या टप्प्यातील मतदानासोबतच आता पाचव्या टप्प्यातील राजकीय घमासानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी रोजी 10 जिल्ह्यात 60 मतदारसंघांत मतदान होणार आहे.

लखनौला लागूनच असलेल्या बाराबंकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वाजता पोहोचले. अमेठी, सुल्तानपूर, प्रतापगड आणि रायबरेली येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रतापगड आणि प्रयागराज येथे सभा झाली. बहराइच येथे अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला तर काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनाथ सरचिटणीस प्र्रियांका गांधी-वधेरा यांनी अमेठीत घरोघरी प्रचार केला. लखनौत सकाळी सकाळीत बसपा प्रमुख मायावतींनी 'सपाला मतदान म्हणजे गुंडाराज, माफिया राजला मतदान', असे वक्तव्य केले.

सपाचा सुपडासाफ, अखिलेश यांची अनामत जप्त होणार : योगी

सुलतानपूर : इसौली मतदारसंघातील सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, यावेळी करहलच्या जनतेने ठरवले आहे की, सपाचा सुपडासाफ करणार. आतापर्यंतचे कलही तेच सांगत आहेत. समाजवादी पक्षाच्या प्रमुखाची अनामत रक्कम जप्त करण्याचे आता करहलच्या नागरिकांनी ठरवले आहे. बसपाने गत निवडणुकीत 19 जागा जिंकल्या होत्या. आता त्या निम्म्या होतील. काँग्रेसचे नेतेच काँग्रेसला बुडवतील. एक दमदार सरकारच मोठ्या योजना आणू शकते.

कुटुंबवादींनी यूपीवर अन्याय केला : मोदी

बहराईच येथील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेश देशातील 16 टक्के जनता राहते. त्यामुळेच यूपीचा विकास देशाच्या विकासासाठी अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळेच विकासाला मतदान करा. भाजपपूर्वीचे सत्ताधारी हे कुटुंबवादी होते. त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबाचे भले केले. या लोकांना जनता नेहमी गरीबच राहावी, असे वाटत होते. त्यामुळेच यांनी यूपीतील लोकांना संधीच दिली नाही. त्यांच्या समस्या सोडवल्याच नाहीत. लोकांच्या रेशन धान्याची लूट केली. भाजपने 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजना आणून यांचा डाव हाणून पाडला. दरम्यान, कौशांबी येथेही मोदींची सभा झाली.

सपाने दहशतवाद पोसला : नड्डा

देवरिया : पूर्वांचलमधील देवरिया येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अखिलेश यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, दहशतवाद्यांना आसरा देणार्‍या, दहशतवाद्यांच्या वडिलांना घरी बोलावणार्‍या, त्यांच्यासोबत भोजन करणार्‍या अखिलेश यादव यांना यूपीची जनता ओळखून आहे. जनता त्यांना मतदानातून उत्तर देईल. अखिलेश यांनीच गोरखपूर, वाराणसी, फैजाबाद आणि लखनौ कचेरीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींवरील खटला रद्द करण्याला सामाजिक सद्भाव असे म्हटले होते. हायकोर्टाचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी हा निर्णय फेटाळला. सपाने दहशतवाद पोसला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

संपूर्ण भाजप सरकारच खोटारडे : अखिलेश यादव

बहराईच : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बहराईच येथे सपा उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी सभेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, डबल इंजिन सरकारचे तुणतुणे नेहमी वाजवले जाते. पण डबल इंजिन सरकार असताना शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. उलट महागाई आणि भ्रष्टाचार डबल झाला. हिटलरच्या काळात केवळ एकच प्रोपगंडा मंत्री होता, पण आपल्याकडे संपूर्ण भाजप सरकारच खोटारडे आहे. सरकार खोटे बोलत आहे. विमानतळे, विमाने, जहाजे, बंदरे, रेल्वे, रेल्वेस्थानके आणि जनतेच्या पैशातून बनलेल्या सरकारी कंपन्या भाजप सरकारने विकल्या. जर लोकशाहीच नसेल तर सरकारी नोकर्‍या कुठून मिळतील, असा सवालही त्यांनी केला.

हे सरकार उद्योगपतींचे : प्रियांका गांधी

अमेठी : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी अमेठीतील जगदीशपूर येथील सभेत भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या, अमेठीत येऊन कुटुंबात परत आल्यासारखे वाटत आहे. सरकारने नागरिकांची अवस्था अशी बनवली आहे की, थोड्याशा धान्यासाठी आणि हजार-दोन हजार रुपये देऊनही हे सरकार नागरिकांना भ्रमित करत आहे. सरकार नागरिकांना जाणीवपूर्वक गरीबच ठेवत आहे. नागरिकांनी आत्मनिर्भर व्हावे, सशक्त व्हावे, असे सरकारला वाटतच नाही. त्यामुळे लोकांनीच आता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. हे सरकार केवळ उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करत आहे. केंद्राच्या धोरणात सर्वसामान्यांच्या भल्याचे काहीही नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news