मडगाव : पुढारी वृत्तसेवा; लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी आपल्या पोलीस स्थानकावरील पोलीस उपनिरीक्षक विराग पवार याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. संशयिताने कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी मडगाव पोलिसांनी हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.
सांगोल्डा धमकीप्रकरणी आधीच पोलिसांचे नाव बदनाम होत आहे. त्यातच हे प्रकरण उघडकीस आल्याने रक्षकच जेव्हा भक्षकांची भूमिका बजावतात तेव्हा, सामान्य माणसाने कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या अत्याचारप्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी पवार यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. मडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून लग्नाचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील एका हॉटेलात आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या महिलेने पुरावे म्हणून काही आक्षेपार्ह व्हिडीओही तक्रारी समवेत जोडले असल्याची माहिती मिळाली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विराग पवार उत्तर गोव्यातील रहिवासी असून हल्लीच मडगाव पोलीस स्थानकात उपनिरीक्षक पदी रुजू झाला होता.
हेही वाचा