पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीमध्ये कुठलीही भांडणे व संघर्ष नाही. हा वाद फक्त टीव्हीवर दाखवण्यापुरता आहे. आतमध्ये आम्ही सर्व एकत्र बसतो. असा दावा करीत 'राजकीय लोकांची भांडणे कधी खरी असतात का? असा उलटप्रश्न राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
नाशिकमध्ये 'प्रहार'तर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि एका खटल्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
अधिक वाचा
सध्या महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात सुरू असलेल्या वादावर विचारलेल्या प्रश्नावर ना. कडू यांनी फार मिश्किल उत्तरे दिली.
संघर्ष आहे, असे आम्ही फक्त टीव्हीवर सांगत असतो, प्रत्यक्षात तसे काही नसते. शरद पवार, नाना पटोले यांचे वाद खोटे आहेत, असेही ते म्हणाले.
माजी मंत्री संजय राठोड प्रकरणी बोलण्यास नकार देत मी खूप लहान माणूस आहे, तो उद्धव ठाकरे यांचा प्रश्न आहे, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गेल्या आठवड्यात देशभरात 'लव्ह जिहाद' म्हणून गाजलेल्या नाशिकमधील प्रकरणाचीही ना. बच्चू कडू यांनी दखल घेतली. संबंधित कुटुंबाच्या घरी भेट देत त्यांना धीर दिला.
हे जिहाद वगैरे काही नसते. सर्व धर्म एकच आहेत. या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये. ती आमची दिव्यांग भगिनी आहे. नाशिकला बिनधास्त लग्न करा, मला बोलवा, मी स्वतः लग्नात नाचेल, नाहीतर अमरावतीला या मी दोघांचे लग्न लावून देतो, असेही आश्वासन ना. कडू यांनी 'त्या' कुटुंबाला दिले.
अधिक वाचा
चार वर्षांपूर्वी नाशिकचे तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या खटल्यात अटक वॉरंट रद्द करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि.१६) नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजेरी लावली.
अटक वॉरंट रद्द करण्यात आला असून, येत्या ३० जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हे ही वाचलंत का ?