नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाला भाविकांनी शुक्रवारी (दि.९) वाजत गाजत निरोप दिला. ढोल, ताशा, बँजोच्या वादनात गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तामुळे कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. वाकडी बारव येथून गणपती विसर्जन मुख्य मिरवणूकीची ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल, ताशांच्या निनादात उत्साहात सुरूवात झाली.
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाचा गणपती होता. त्यानंतर शहरातील २३ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. मिरवणूकीच्या सुरुवातीस ना. महाजन यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मिरवणूकीस गणरायांच्या आकर्षक मूर्ती, रंगीत रोषणाई, ढोलपथकाची साथसंगत, पावसाची हजेरी यामुळे रंगत आली होती. भाविकांनी व मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मिरवणूकीचा आनंद लुटला. पोलिसांच्या नियोजनामुळे कोठेही अनुचीत प्रकार झाला नाही. अनेकांनी ढोलपथक, बँजोच्या तालावर नाचून विसर्जन मिरवणूकीचा आनंद लुटला. गर्दीचे नियोजन सुरळीत झाल्याने पोलिसांवरील ताणही बराचसा हलका झाल्याचे दिसत होते. रात्री बारा वाजता मिरवणूकीची सांगता करण्यात आली.
अन् ढाेलवादन थांबवले
मुख्य विसर्जन मिरवणूकीतील रंगत वाढलेली असतानाच दुपारच्या अजानला सुरुवात झाली. त्यामुळे अजान कानी पडताच जुने नाशिकमधील शिवसेवा मित्र मंडळाच्या ढोलपथकाने ढोल वादन थांबवले. त्यानंतर इतर मंडळांनीही ढोल वादन थांबवले. अजान आटोपल्यानंतर पुन्हा मिरवणूकीस सुरुवात झाली. याआधीही मिरवणूकांमध्ये हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडलेले आहे.
मिरवणूकीतील सहभागी मंडळे…
नाशिक महापालिका कर्मचारी गणेशोत्सव समिती, रविवार कारंजा मित्र मंडळ, गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्र मंडळ, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ, सूर्यप्रकाश नावप्रकाश मित्र मंडळचा नाशिकचा राजा, सरदार चौक मित्र मंडळ, रोकडोबा मित्र मंडळ, शिवसेवा मित्र मंडळ, शिवमुद्रा मित्र मंडळाचा मानाचा राजा, मुंबई नाका युवक मित्र मंडळ, दंडे हनुमान मित्र मंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शैनेश्वर युवक समिती, नेहरू चौक मित्र मंडळ, वेलकम सहकार्य मित्र मंडळ, श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ, युवा संघर्ष प्रतिष्ठान, गजानन मित्र मंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन या मंडळांचा मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभाग होता.
सार्वजनिक उत्सवातील गुन्हे शासनाने घेतले मागे
ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, मागील गणेशोत्सव व दहिहंडी सारख्या उत्सवांमध्ये दाखल असलेले सर्व गुन्हे महाराष्ट्र शासनाने मागे घेतले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या जोषात व उत्साहात साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.