डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: पश्चिम डोंबिवलीतील ठाकुर्लीजवळ गाढ झोपेत असलेल्य रेल्वे खलाशाचे उंदराने डोळे कुरतडल्याने त्याचा मृत्यू झाला. इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तो राहत असलेल्या परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीसह तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरेश भिवा साळवे (४५) असे या दुर्दैवी खलाश्याचे नाव आहे.
साळवे कुटुंब पश्चिम डोंबिवलीच्या बावन्नचाळ परिसरातील खापरीबाबा मंदिरामागच्या रेल्वे कॉर्टरमधील आर बी १/१९५ इमारतीतील ७ क्रमांकाच्या खोलीत राहते.
साळवे कुटुंबीय राहत असलेल्या चाळीला खड्ड्याची चाळ असे संबोधले जाते. या कुटुंबात सुरेश यांची पत्नी रेखा (४०) या गृहिणी आहेत.
१७ वर्षीय संकेत हा बाराव्या इयत्तेत, १३ वर्षीय दीक्षा ही आठव्या इयत्तेत, तर ११ वर्षीय अनिकेत हा पाचव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे.
पित्याच्या मृत्यूनंतर या मुलांना शोक अनावर झाला आहे.
सुरेश साळवे हे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे खलाशी म्हणून नोकरी करत होते.
बुधवारी १ सप्टेंबरच्या रात्री ते घरात झोपले असता त्यांचा डोळा व पायाची बोटे उंदराने कुरतडले.
सकाळी ८ वाजता मुलाला व पत्नीला जाग आल्यावर सुरेश यांच्या डोळ्याजवळून रक्तस्त्राव होत असल्याचे आढळले.
घरच्यांनी तात्काळ त्यांना कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये हलवले.
तेथील डॉक्टरांनी तपासले असता सुरेश यांच्या डाव्या डोळ्याचे बुबुळ उंदराने कुरतडल्याचे आढळून आले.
डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.
दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी शुद्धीवर आलेल्या सुरेश यांचा त्याच रात्री मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
वास्तविक उंदराने डोळा कुरतडल्याने त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तेथील डॉक्टरांनी अल्कोहॉलिक इन्फेक्शनमुळे फंक्शन फेल झाल्याचे सांगितले.
सुरेश यांचे उंदराने डोळे कुरतडल्याने मृत्यू झाल्याने साळवे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
तर ते राहत असलेल्या खड्ड्याची चाळ परिसरातील रहिवाश्यांमध्ये तणावयुक्त भीतीचे वातावरण पसरले आहे.
बावन्नचाळ रेल्वे वसाहतीत सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावर वाहत असते.
त्यामुळे उंदीर आणि घुशींचे साम्राज्य आहे.
त्यामुळे या भागातील रहिवासी जीव मुठीत धरून रोगराईशी सामना करत आहेत.
महानगरपालिका प्रशासनाकडून या भागातील रहिवाश्यांकरिता कोणत्याही नागरी सोयी-सुविधा पुरवल्या जात नाहीत.
रेल्वे प्रशासनाकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने ते एकमेकांवर आपापल्या विभागाची जबाबदारी झटकत असतात.
ठाकुर्ली पश्चिम स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून स्टेशनवर जावे लागते.
रात्रीच्या सुमारास या भागात विषारी सापांचा सुळसुळाट असतो, असे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पगारे यांनी सांगितले.
हेही वाचा: