नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सीमेवर भारत-चीन लष्करादरम्यान तणावाची स्थिती कायम असताना भारत सरकारने पुन्हा एकदा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' (डिजिटल हल्ला) केला आहे. भारताच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे कारण नमूद करून सरकारने 54 चिनी स्मार्टफोन अॅप्सवर देशात बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले 'गरेना फ्री फायर' आणि 'अॅपलॉक' हे अॅप्सही समाविष्ट आहेत. आयटी अधिनियमाच्या कलम 69 अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याआधी जून 2020 मध्ये देशाच्या सुरक्षिततेच्या कारणावरूनच भारताने 'टिकटॉक', 'व्हीचॅट' आणि 'हॅलो' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती.
गरेना फ्री फायर हे अॅप यापूर्वीच गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. याउपर या अॅपचे नावही बंदी घालण्यात आलेल्या यादीत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात या गेमचे वितरक 'गरेना इंटरनॅशनल'कडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेली नाही.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने बंदीचा हा निर्णय घेतला आहे. हे सर्व अॅप्स चीनसह अन्य देशांत भारतीय युजर्सचा डेटा (माहिती) पाठविण्याचा गुन्हा करत होते. गुगल प्ले स्टोअरने तत्काळ भारत सरकारच्या आदेशांचे पालन करून हे अॅप्स हटवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने 54 अॅप्सवर बंदी घातलेली असली तरी या अॅप्सची संपूर्ण यादी उपलब्ध झालेली नाही. बंदी घालण्यात आलेल्या 11 अॅप्सची नावे मात्र समोर आली आहेत ती अशी : 1. स्वीट सेल्फी एचडी, 2. ब्युटी कॅमेरा- सेल्फी कॅमेरा, 3. इक्वालायझर आणि बास बूस्टर, 4. कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स एंट, 5. आयसोलँड 2 : अॅशेस ऑफ टाईम लाईट, 6. व्हिवो व्हिडीओ एडिटर, 7. टेनसेंट एक्सरिव्हर, 8. ऑनमायोजी चेस, 9. ऑनमायोजी अॅरिना, 10.अॅपलॉक, 11. ड्युएल स्पेस लाईट.