गणेशोत्सवात चाकरमान्यांना यंदाही महामार्ग ‘टोल फ्री’: दहा हजारांहून अधिक वाहनांना लाभ होणार

गणेशोत्सवात चाकरमान्यांना यंदाही महामार्ग ‘टोल फ्री’: दहा हजारांहून अधिक वाहनांना लाभ होणार

किणी(राजकुमार चौगुले), पुढारी वृत्‍तसेवा :  गणपती सणासाठी पुण्या- मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोल माफी जाहीर केली आहे. या महामार्गावरील विविध टोल नाक्यावर सुमारे दहा हजारहून अधिक वाहनांना टोल सवलतीचा फायदा मिळणार असून यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवाना असणारे स्टिकर घ्यावे लागणार आहे.

वर्षभर गावी नाही गेले तरी गणेश चतुर्थीला हमखास गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई -गोवा महामार्गावर होणारा उशीर व प्रवास करणे धोकादायक आणि अवघड बनले होते. मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेने गेले तर भरमसाट भरावा लागणारा टोल यामुळे खास गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणार्‍या भक्तांना गणेशोत्सव काळात टोलमाफी देण्याची घोषणा केली आहे. कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणार्‍या गणेशभक्तांच्या कार ,जीप यांसारख्या वाहनांना जाताना व गणेश विसर्जनानंतर परतणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला आहे.  ही सवलत एसटी बसेसना ही लागू होण्याची शक्यता आहे.

२०१८ पासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने महामार्गावरील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली हाेती. कोकणात जाणार्‍या वाहनांना 'गणेशोत्सव-कोकण दर्शन' या नावाचे स्टीकर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आले होते. टोल सवलतीचा हा कालावधी गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि गणेशोत्सवानंतर येताना गणेश विसर्जनापर्यंत देण्यात आला होता.

यावर्षीही अशी सवलत लागू केल्याची घोषणा करण्यात आली असून यासाठी स्थानिक पोलीस ठाणे व प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी करून त्यांच्याकडून वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर घ्यावे लागणार आहे. पुण्याहून निघाल्यानंतर चिपळूणकडे जाणारी वाहने कराड पासून पाटण मार्गे , रत्नागिरी , राजापूरला जाणारी वाहने किणी -वाठार वारणा मार्गे आंबा घाटातून ,देवगड ,कणकवलीस जाणारी वाहने कोल्हापूर, गगनबावडा मार्गे करूळ घाटातून तर कुडाळ मालवण सावंतवाडी, गोव्यास व कर्नाटकात जाणारी वाहने आजरा आंबोली मार्गे जात होती. या काळात किणी(जि. कोल्हापूर) व तासवडे (जि. सातारा) यासह महामार्गावरील टोल नाक्यावरून सुमारे दहा हजाराहून अधिक पासधारक वाहने मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news