NH-4 Highway: पुणे-सातारा महामार्गावरील बोगद्याचे काम प्रगतीपथावर; मंत्री नितीन गडकरींची माहिती | पुढारी

NH-4 Highway: पुणे-सातारा महामार्गावरील बोगद्याचे काम प्रगतीपथावर; मंत्री नितीन गडकरींची माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ वरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि.६) ट्विटरवरून दिली. सातारा-पुणे दिशेला असलेला सध्याचा ‘एस’ वळणमार्ग लवकरच पूर्ण होईल, त्यामुळे अपघात जोखमीत मोठी घट होईल, असा विश्वास गडकरी यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. ६.४३ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी एकूण भांडवली खर्च अंदाजे ९२६ कोटी रुपये असून मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

या बोगद्यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार असून, प्रवाशांचा वेळ तसेच पैशात बचत होईल. पुणे-सातारा आणि सातारा-पुणे हा खंबाटकी घाटमार्गे अनुक्रमे ४५ मिनिटे आणि १०-१५ मिनिटांचा प्रवास वेळ आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, या प्रवासाचा सरासरी वेळ कमी होऊन ५-१० मिनिटांवर येईल असे गडकरी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून समृद्धी उलगडत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची मागणी नव भारत करीत असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली.

हेही वाचा:

Back to top button