खेड बाजार समिती सभापती आणि सचिवांचे सह्यांचे अधिकार काढले

खेड बाजार समिती सभापती आणि सचिवांचे सह्यांचे अधिकार काढले
खेड बाजार समिती सभापती आणि सचिवांचे सह्यांचे अधिकार काढले

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : खेड कृषी उत्पन्न बाजार समिती (ता. खेड जि. पुणे)चे सभापती विनायक घुमटकर,सचिव बाळासाहेब धंद्रे यांचे सह्यांचे अधिकार संचालक मंडळाने रविवारी (दि ८) झालेल्या मासिक बैठकीत काढून घेतले आहेत.

सभापती विनायक घुमटकर हे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.मात्र मोहिते पाटील समर्थक आणि विरोधकांनी एकत्रित पणे घुमटकर व धंद्रे यांना कोंडीत पकडल्याचे सांगण्यात आले.बाजार समिती संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत ऑगस्ट महिन्यात संपत आहे.संचालक मंडळाचा कार्यकाल पूर्ण होत असताना सभापती, सचिवांवर गंभीर आरोप झाल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सभापती विनायक घुमटकर व सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी गेल्या वर्षभरात झालेल्या चाकण बाजार समिती आवारातील सिमेंट काँक्रीटीकरण व इतर विकास कामात मनमानी कारभार केला.कमी रकमेच्या निविदाना मंजुरी असताना वाढीव रकमेच्या निविदा स्वीकारण्यात आल्या.तसेच चाकण बाजार समितीत तरकारी विक्री साठी व्यापाऱ्यांना गाळे शिल्लक नसताना लायसन्स देऊ नये असा संचालक मंडळाचा ठराव असताना २६ लायसन्स परस्पर वाटप केल्याच्या आरोप करण्यात आला. सभेला १७ संचालक उपस्थित होते.

बाजार समितीच्या व्यापारी लायसन्स व विकास कामात मनमानी व भ्रष्टाचार कारभार केल्याचा आरोप सभापती, सचिवांवर आहे. त्यावरून सह्यांचे अधिकार काढुन घेण्यात आले. हे अधिकार माजी सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव पदासाठी संतोष गायकवाड यांना देण्यात आले आहेत.

सभापती घुमटकर यांनी दिलेले सर्व म्हणजे२६ व्यापारी लायसन्स आजच्या सभेत रद्द करण्यात आले. समितीच्या कारभारात झालेल्या कथित भ्रष्टाचार व इतर कारवाई मध्ये चौकशी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे , राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटील समर्थक संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे,धैर्यशील पानसरे,माजी सभापती विलास कातोरे , चंद्रकांत इंगवले ,भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांची चौकशी समिती नेमली अशी माहिती सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

विकास कामातील तांत्रिक त्रुटी मुळे आरोप झाले आहेत. प्रत्यक्षात काहीही नाही. तर व्यापारी लायसन्स देताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार नाही.तरीही आरोप झाले आहेत.त्याची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी समिती नेमण्याची शिफारस आपण स्वतः केली. संचालक मंडळाच्या बैठकीत हसत खेळत विषयावर चर्चा झाली.
विनायक घुमटकर, सभापती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news