कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील नागरिकांच्यात कोरोना अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का? याचा शोध महापालिका घेणार आहे. पुण्यातील नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहयोगाने कोल्हापूर महापालिका हे संशोधन करणार आहे. येत्या पंधरा दिवसात या उपक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
त्यासंदर्भात सोमवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखील मोरे यांनी पुण्यातील संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राथमिक चर्चा केली.
संबंधित संस्थेचे कर्मचारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरात सर्वेक्षण करून ऑंटीबॉडीज तपासणार आहेत. यात कोरोना संसर्ग झालेले व कोरोणा प्रतिबंधक लस घेतलेले यांचा समावेश नसेल.
कोरोना न झालेले आणि लसही न घेतलेल्या व्यक्तींना शोधून त्यांचे रक्त अँटीबॉडीज तपासणीसाठी घेतले जाणार आहे.
कोल्हापूर शहरात साडेपाच लाख लोकसंख्या असून त्यापैकी 1 लाख 54 हजार 588 नागरिकांची पहिला व 1 लाख 191 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
आजअखेर 52 हजार 626 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोल्हापूरात हाहाकार माजवला. परिणामी राज्यात रुग्ण व मृत्युदर ही कोल्हापुरात सर्वाधिक होता.
लसीकरणानंतर व महापालिकेने राबविलेल्या विविध प्रयत्नानंतर कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.