पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या दिवसाची सुरुवातच फ्रेश अशी 'काॅफी' प्यायल्याने होतो. नाही का? काॅफी प्यायल्याने आपल्या अंगात उत्साह निर्माण होतो. तरतरी येते. पण, दक्षिण ऑस्ट्रेलियातील विद्यापीठानं नुकतंच एक संशोधन केलेलं आहे की, जास्त काॅफी प्यायल्याने माणसाच्या मेंदूवर त्याचे परिणाम होतात. त्यातून माणसाला स्मृतीभ्रंशाचा धोका असल्याची शक्यता आहे.
संशोधक असं म्हणतात की, "काॅपी जास्त प्रमाणात प्यायल्याने छोट्या मेंदूवर घातक परिणाम होतो. त्यातून माणूस वेडा होण्याची दाट शक्यता आहे." हे संशोधन 'न्युट्रिशनल न्युरोसायन्स' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
'ऑस्ट्रेलियन सेंटर फाॅर प्रेसिजन हेल्थ एट एसएएचएमआरआय'च्या आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या टीमने हे संशोधन केलेलं आहे. त्यांच्या अभ्यास असं सांगितलं आहे की, एकूण १७ हजार ७०२ लोकांच्या काॅफी पिण्यावर संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये ३७ वर्षांपासून ७३ वर्षांपर्यंतचे लोक होते.
यामध्ये दिवसातून ६ वेळा काॅफी पिणाऱ्यांची संख्या अधिक होती. ५३ टक्के लोकांच्या मेंदूवर परिणाम झालेला दिसून आला. इतकंच नाहीतर, या लोकांनी डिमेंशिया (स्मृतीभ्रंश) आजाराला आमंत्रण दिल्यांचं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं आहे.
या विषयावर अभ्यास करणारे पीएचडी विद्यार्थी किट्टी फाम म्हणतात की, "काॅफी ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पेय आहे. जगात वर्षभरात ९ अब्ज किलोग्रॅम काॅफी वापरली जाते. ही बाब माणसांच्या आरोग्यावर भयानक परिणाम करणारी आहे."
"काॅफीबद्दलचा हा अभ्यास विस्तृतपणे करण्यात आला. त्यामध्ये माणसांच्या मेंदूवर काय परिणाम होतो, विस्मरणाच्या आजाराची किती जोखीम असते, तसेच ब्रेन हॅमरेज होण्याचं किती प्रमाण असू शकतं, याचा अभ्यास करण्यात आला. मेंदूवर किती प्रमाणात इजा होते, त्याची विस्तृत वर्गवारी करण्यात आली आहे", अशी माहिती किट्टी फाम यांनी दिली.
किट्टी फाम पुढे सांगतात की, "या सर्वांचा अभ्यास करताना सातत्याने हे अधोरेखित होत होतं की, जास्त काॅफी पिण्याचा परिणाम हा सरळ मेंदूवर होत आहे. दिवसाला ६ पेक्षा अधिक काॅफी पिणाऱ्या व्यक्तीला डिमेंशिया किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची जास्त शक्यता आहे."
डिमेंशिया : या आजाराला स्मृतीभ्रंश असं म्हणतात. यामध्ये माणसाची स्मरणशक्ती, विचार, वर्तन, इतकंच नाहीतर रोजच्या कामावरदेखील परिणाम होणे. जगभरात ५० कोटी लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. कारण, या आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. दिवसाला अंदाजे २५० लोक डिमेंशिया या आजाराने मृत्यू पावतात.
स्ट्रोक : या आजारात मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये व्यत्यय येतो. त्यामध्ये मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. तसेच मेंदू निकामी होतो. जगाचा विचार केला, तर २५ वयोगटातील प्रत्येक ४ माणसांमागे एकाचा मृत्यू हा स्ट्रोकमुळे होतो आहे. यावर्षी १३ कोटी ७ लाख लोकांना स्ट्रोकचा आजार झालेला आहे. त्यातील ५ कोटी ५ लाख लोक स्ट्रोकमुळे मरणार आहेत.
वरिष्ठ संशोधक आणि 'ऑस्ट्रेलियन सेंटर फाॅर प्रेसिजन हेल्थ एट एसएएचएमआरआय'चे संचालक प्रोफेसर एलिना हिप्पोनेन म्हणतात की, "काॅफीप्रेमींसाठी हे संशोधन आनंदाची बातमी असणार नाही. मात्र, या संशोधनातून आपल्या आरोग्यासाठी काय चांगले आहे आणि उत्तम आरोग्यासाठी आपण कोणते पेय घेऊ नये, याच्यातील संतुलन राखणं महत्वाचे आहे."
"हे संशोधन जास्त प्रमाणात काॅफी पिणे आणि त्याचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होणे, याबद्दल माहिती देते. आरोग्याबद्दल अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे काॅफी पिण्यावर संयम ठेवणे फार गरजेचे आहे", असे प्रोफेसर एलिना हिप्पोनेन सांगितलं आहे.
प्रोफेसर एलिना हिप्पोनेन पुढे सांगतात की, "या संशोधनातून एक गोष्ट वारंवार अधोरेखित होते. ती म्हणजे काॅफीचं जास्त सेवन करणं हे थेट मेंदूवर परिणाम करणारं आहे. यावर उपाय काय असू शकतो, हे माहीत नाही. पण, आपण काॅफीचा एक कप प्यायल्यानंतर थोडसं पाणी पिणं, उत्तम आहे", असंही हिप्पोनेन यांनी सांगितलं.
"दिवसांतून दोन वेळ काॅफी पिणं योग्य आहे. पण, जेव्हा दिवसांतून ६ कपांपेक्षा जास्त काॅफी आपण घेतो आहे, असं वाटलं तर पेय बदलण्यावर विचार करणं गरजेचं आहे", असं प्रोफेसर एलिना हिप्पोनेन यांनी सल्ला दिला आहे.