पंजाब : काँग्रेसला गटबाजीचाच फटका बसू शकतो

पंजाब : काँग्रेसला गटबाजीचाच फटका बसू शकतो
Published on
Updated on

चंदीगड : वृत्तसंस्था

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा पंजाब मॉडेलवर चर्चा केली. पंजाबमधील माफियाराजचा सफाया करणार असल्याचे सांगत राज्यात काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही. केवळ काँग्रेसच्या गटबाजीचा फटका बसेल, असे सिद्धू यांनी सांगितले. सिद्धू अमृतसर पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर ठिकाणी शिरोमणी अकाली दलाने विक्रम सिंग मजीठिया यांना तिकीट दिले आहे. निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर सिद्धू म्हणाले, यावेळी आमची लढाई माफियाराजबरोबर आहे. माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिल्यास त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. ईट का जवाब पत्थर से देना हमे मालूम है!

अमृतसर शहरात अकाली दलाचे बदमाश लोक येत आहेत. त्यांना लोकांनी नाकारले असताना ते बदमाशी करत आहेत. अकाली दलाच्या बदमाशांनी गँगस्टरना आश्रय दिला. पोलिसांच्या छाताडावर गोळ्या झाडल्या. राज्यात काँग्रेस मजबूत सरकार देणार असून व्यापारास चालना देणार असल्याचे सिद्ध यांनी यावेळी नमूद कले.

ते म्हणाले, वाळू माफिया, दारू माफिया, भू-माफियांचा अकाली दलांमध्ये समावेश आहे. या लोकांनी जनतेला घाबरवून त्यांचा रोजगार काढून घेतला. जे इमानदार आहेत तेच आपल्या समवेत आहेत. मला कोणतेही घाणेरडे राजकारण करावयाचे नाही. कोणत्याही माता-भगिनींना त्रास द्यावयाचा नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या दौर्‍यात पंजाब मॉडेलची घोषणा केली असल्याचे सिद्धू यांनी सांगितले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये डबल इंजिनचे सरकार देणार असल्याच्या दाव्यावर सिद्धू म्हणाले, त्यांच्या इंजिनने कधीच धूर टाकला आहे. त्यांनी माझ्याबरोबर अर्धा तास बॅडमिंटन खेळून दाखवावे, मी राजकारण सोडतो, असे सांगत अमरिंदर सिंग यांची यावेळी खिल्ली उडवली. विक्रम मजिठीया माझ्या गाडीवर चालक होता. माझ्यासाठी तो सूप बनवत असे. तो उत्तर प्रदेशातून पळून आला आहे, तो मला काय राजकारण शिकवणार. मजिठीया दोन नंबरवाला माणूस आहे. त्याने वाळू आणि केबलमधील पैसे खाल्ले आहेत. त्याच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नसल्याचे सिद्धू म्हणाले.

हे लोक मला काय हरवणार!

विधानसभा निवडणुकीत नालायकपणा आणि इमानदारी यांच्यात लढाई आहे. या वेळी सर्व चोर एकत्र आले आहेत. त्यांनी करोडोंच्या मालमत्तेवर डल्ला मारला आहे. हे लोक मला काय हरवणार! मजिठीया याने अनेक वेळा निवडणूक जिंकली. मात्र त्याला कधीच मंत्रिपद मिळाले नाही. तोे सुखबीर सिंग बादल यांचा मेहुणा असल्याने त्याला पहिल्यांदा मंत्रिपद देण्यात आले.

पंजाब निवडणुकीवर काळा पैसा, अमली पदार्थांचे सावट

चंदीगड : वृत्तसंस्था

पंजाब विधानसभा निवडणुकीवर काळा पैसा आणि अमली पदार्थांचे सावट आहे. केवळ 22 दिवसांत 82 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले आहे. यामध्ये 74 कोटींचे ड्रग्ज आणि सुमारे 7 कोटींच्या दारूचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे 17 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने 10 कोटी रुपयांच्या बेकायदा वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने शहरापासून ते सीमेपर्यंत नाकाबंदी केली आहे.

सीमेपलीकडून येणार्‍या ड्रग्जची आयात रोखण्यासाठी पंजाब पोलिस हाय अ‍ॅलर्टवर आहे. पंजाबला लागून असलेल्या हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि चंदीगडच्या सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंजाबच्या बाजारपेठेत काळा पैसा (ब्लॅक मनी) खपवला जाऊ नये यासाठी आयकर विभागाची करडी नजर आहे.

निवडणूक आयोगाने कंट्रोल रूमची व्यवस्था केली आहे. त्याचा टोल फ्री नंबर 18003451545 सुद्धा जारी केला आहे. यासाठी 80 पोलिस अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. विमानतळांवर एअरपोर्ट इंटेलिजन्स युनिटसुद्धा सक्रिय करण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे आणि विमानातून पैशाच्या होणार्‍या हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे. बँकेतील संशयित व्यवहारावरही लक्ष ठेवले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news