माता-पित्याने लस घेतल्यास मुलांनाही मिळते संरक्षण | पुढारी

माता-पित्याने लस घेतल्यास मुलांनाही मिळते संरक्षण

जेरूसलेम : जगात सध्या कोरोना महामारीचा प्रकोप सुरूच आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट जगाची चिंता वाढवत आहेत. या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात सध्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीकरणावर नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या संशोधनातील निष्कर्षानुसार माता-पित्याने घेतलेल्या लसीकरणामुळे घरात त्यांच्या मुलांनाही कोव्हिड-19 महामारीपासून संरक्षण मिळते.

अमेरिकेतील हार्वर्ड व इस्राईलच्या तेल अविव युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले. शास्त्रज्ञांच्या पथकाने कोरोना महामारीसंदर्भातील जगभरातील डेटाचे विश्लेषण केले. लसीकरण न घेता अप्रत्यक्षपणे लहान मुलांना सुरक्षा मिळत आहे का? याची या संशोधनात चाचपणी करण्यात आली.

‘सायन्स जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनातील माहितीनुसार, कोरोनाविरुद्धची लस घेणार्‍या माता-पित्याला महामारीपासून सुरक्षा मिळतेच. याशिवाय घरात असणार्‍या अन्य लोकांचेही या महामारीपासून संरक्षण मिळण्यास मदत मिळते.

मुख्य संशोधक समाह हायक यांनी सांगितले की, लस घेणार्‍या लोकांना कोरोना महामारीपासून सुरक्षा तर मिळतेच, याशिवाय घरात ज्या लोकांनी लस घेतलेली नाही, त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश करावा लागेल.

कोरोना विषाणूचा जगभरात कोट्यवधी लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच अमेरिका, रशिया यांसारख्या महासत्तांबरोबरच अन्य देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.

हेही वाचा

Back to top button