आमदार बाबर २०२४ ची विधानसभा लढवणार नाहीत, गोपीचंद पडळकर यांचा दावा

सांगली : खानापूर तालुक्यातील मोही या गावात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर
सांगली : खानापूर तालुक्यातील मोही या गावात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर
Published on
Updated on

विटा (जि. सांगली) : पुढारी वृत्तसेवा :  २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी ही आमची शेवटची निवडणूक आहे. २०२४ ला तुम्हाला पाठिंबा देऊ, असे खुद्द आणि आमदार अनिल बाबर आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमोल बाबर यांनी आम्हाला शब्द दिला आहे. त्यामुळे आमदार बाबर पुढची विधानसभा लढवणार नाहीत, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खानापूर तालुक्याचे राजकीय वातावरण ऐन थंडीत तापू लागले आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कोणाच्या ग्रामपंचायती किती यावरून राजकीय वातावरण पेटले असतानाच आता भाजपनेही त्यात आता उडी घेतली आहे. खानापूर तालुक्यातील मोही गावात रविवारी रात्री उशिरा कार्यक्रम झाला. यामध्ये मोही गावासह भाजपने दावा केलेल्या ऐनवाडी, घोटीखुर्द आणि ताडाचीवाडी येथील सरपंच आणि सदस्यांसह तालुक्यातील इतर गावात भाजपच्या विचारांच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा जाहीर सत्कार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमांत शिंदे गटाचे आमदार बाबर यांच्याबाबत भर सभेत जाहीरपणे बोलताना आमदार पडळकर यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळेच २०१९ ला आमदार अनिल बाबर हे आमदार झाले. त्यावेळी आपण आमदार बाबर यांना पाठिंबा कसा दिला? याबाबत माहिती देताना आमदार पडळकर म्हणाले, मी बारामती मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उभा होतो. त्यावेळी आमदार बाबर आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमोल बाबर हे मला बारामती क्लब हाऊसला भेटायला आले होते. त्यांनी मला तिथे शब्द दिला होता की, आता आमदार बाबर यांचे वय झाले आहे, २०१९ ची ही त्यांची शेवटची निवडणूक होती.

आताच्या निवडणुकीत तुम्ही आमदार बाबर यांना कसल्याही परिस्थितीत आमदार करा. पुढच्या २०२४ ला आम्ही तुम्हाला म्हणजे गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा देऊ. त्यामुळे २०२४ ची निवडणूक आमदार बाबर लढवणार नाहीत. ते मला बारामती क्लब हाऊसला पहाटे पाच वाजता भेटले होते. त्यानंतर सहा -साडेसहा वाजता आमची चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी तिथे मला शब्द दिलेला आहे. त्यामुळे आता खालच्या कार्यकर्त्यांनी गडबड करायची गरज नाही. त्यावेळी आम्ही आमदार बाबर यांचे काम केले आता २०२४ ला आमदार बाबर आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र अमोल बाबर आणि सुहास बाबर हे तिघेही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. त्यामुळे याबाबत वरिष्ठ निश्चितच विचार करतील असेही आमदार पडळकर म्हणाले.

एवढेच नाही तर आमदार पडळकर पुढे असेही म्हणाले की, आता तुम्ही म्हणाल की, आतापर्यंत हा गप्प का बसला होता आम्हाला हे आधी का सांगितले नाही? तर मी म्हणलं बघूया ते कधी बोलतात काय ठरलंय ते? परंतु ते काही बोलत नाहीत. पण मी तर सांगितलं पाहिजे कारण खानापूर मतदारसंघातील लोकांना सगळं व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. त्यामुळे २०२४ ला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात मोठ्या ताकदीने निवडणूक लढायची आहे आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आमदार अनिल बाबर आणि त्यांचे दोन सुपुत्र यांच्या पाठिंब्यावर आपल्याला निवडून आणायचा आहे कारण त्यांनी तसा शब्द दिलेला आहे, तो त्यांनी पाळायचा आहे, असे आमदार पडळकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news