वाफगाव-राजगुरुनगर रस्त्याची दुरुस्ती अपूर्ण | पुढारी

वाफगाव-राजगुरुनगर रस्त्याची दुरुस्ती अपूर्ण

वाफगाव; पुढारी वृत्तसेवा : वाफगाव- राजगुरुनगर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे दुरुस्तीचे काम दिवसांपूर्वी केले होते. परंतु, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच असून, बहुतांश ठिकाणी रस्ता दुरुस्ती केली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. काम अपूर्ण ठेवून कामगार निघून गेल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. राजगुरुनगर – वाफगाव – वरुडे हा रस्ता खेड तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाचा रस्ता आहे. तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे मजबुतीकरण केले होते. परंतु, काही वर्षांत हा रस्ता वाहतुकीला अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.

गुळाणी घाटात या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. घाटात पावसाने रस्त्याच्या साईडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे, त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले, याबाबत दै. ‘पुढारी’ने आवाज उठविला होता. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली होती.

परंतु, अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत. पॅच न मारता खड्डे भरले आहेत. खड्ड्यावर खडी भरून रोलर फिरविला गेला नाही. बांधकाम विभागाने रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली आहे. बारा किलोमीटर लांबीचा हा रस्ता खड्ड्यांमुळे पार करताना ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या सर्व रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button