नागपूर, पुढारी वृत्तसेवा: एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आंघोळीचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. तब्बल दहा महिन्यानंतर या घटनेची तक्रार पीडित तरुणीने पोलिस स्टेशनला केली आहे.
संशयित तिघेही आरोपी अल्पवयीन पीडित मुलीच्या परिचयातील आहेत. तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ या तिघांनी काढला.
तो दाखवून तिचे अपहरण केले. तिला निर्जनस्थळी नेऊन दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार नागपूर शहरातील मानकापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलीला सिगारेटचे चटके देखील दिले.
एवढेच नाही तर अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी तिच्याकडे तीन लाख रुपयेही मागितले.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.
ही घटना नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यानची आहे. यापैकी मुख्यआरोपी हा पीडित तक्रारदार मुलीच्या नातेसंबंधातील आहे.
सलग सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ आरोपी हे पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते.
आरोपींच्या रोजच्या जाचाला कंटाळून पीडित मुलीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गुरूवारी रात्री मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्याआधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंगेश, निलेशसिंग, आणि आकाश नावाच्या या तिघांचा समावेश आहे.
या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी असल्याची शक्यता असून त्यांना देखील अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींनी मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला निर्जनस्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी तिला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी तिला दिली होती. मात्र एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी तिला 'घरात चोरी कर आणि आम्हाला टप्या-टप्याने पैसे दे, अन्यथा तुझी बदनामी करू', अशी धमकी दिली होती.
हेही वाचा: