Yuva Pudhari 2024 : ‘युवाशक्ती’ने जिंकली उपस्थितांची मने

Yuva Pudhari 2024 : ‘युवाशक्ती’ने जिंकली उपस्थितांची मने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आपणही समाजाचे काही देणं लागतो, या कर्तव्यनिष्ठ भावनेने स्वत:ला झोकून देत समाजकार्यात अग्रणी असलेल्या युवाशक्तीला दै. 'पुढारी'तर्फे (Dainik Pudhari) शनिवारी (दि.२४) युवा पुढारी- २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या कार्य-कर्तृत्वामधून समाजाच्या विविध क्षेत्रात ठसा उमटविलेल्या युवकांनी त्यांच्या यशामागील गमक उलगडताना उपस्थितांची मने जिंकून घेतली. उत्तराेत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमामधून सन्मानार्थी पुरस्कारार्थींनी समाजातील अन्य युवकांपुढे नव्याने आदर्श घालून दिला आहे. (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)

जागतिक महासत्तेचे स्वप्न उराशी बाळगलेल्या भारताच्या वाटचालीत युवाशक्तीचे योगदान महत्त्व पूर्ण आहे. सामाजिक कार्यामधून समाजाला एकसंध बांधणाऱ्या युवाशक्तीचा शोध घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याबद्दल आ. सत्यजित तांबे यांनी दै. 'पुढारी'चे (Dainik Pudhari) आभार मानले. साडेआठ दशकांची परंपरा असलेल्या 'पुढारी'ने समाजातील विविध प्रश्नांना हात घालताना ते सोडविण्यासाठी आपल्या लेखणीतून नेहमीच आक्रमक भूमिका घेतल्याची आठवण तांबे यांनी सांगितली. विद्यार्थी चळवळीमध्ये कार्य करताना वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांचे कात्रण आजही आपण जपून ठेवले आहेत. आज ही कात्रणे बघताना त्यावेळेच्या कार्याची अनुभूती येत असल्याची भावना तांबे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सूत्रसंचालक ॲड. अभिजित साबळे यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधताना जीवनामध्ये ते कसे घडले याबद्दल त्यांना बोलते केले. (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)

'पुढारी'वर काैतुकाचा वर्षाव
पुढारी युवा पुरस्काराने सन्मानित केलेल्या सन्मानार्थींनी दै. 'पुढारी'वर (Dainik Pudhari) कौतुकाचा वर्षाव केला. विविध सामाजिक चळवळीत कार्यरत असताना 'पुढारी'ने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा शोध घेत एका छताखाली आणत आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल पुरस्कारार्थींनी आभार मानले. यावेळी रश्मी हिरे- बेंडाळे यांनी मनोगतात त्यांच्या आजोबांची आठवण सांगताना ते नेहमीच 'पुढारी'च्या (Dainik Pudhari) अग्रलेखाचे वाचन करण्याचा सल्ला द्यायचे. तसेच 'पुढारी'चा अग्रलेख हा समाजमनाचा आरसा असल्याची भावना हिरे-बेंडाळे यांनी व्यक्त केली. जगदीश गोडसे यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमधील गुणांना वाव देत ते सामन्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य 'पुढारी'ने केल्याबद्दल आभार मानले.

गुण वाखाणण्याजोगे : गोडसे
पुरस्काराप्रसंगी उत्तर देताना जगदीश गोडसे यांनी समाजाप्रति काम करणाऱ्या युवकांचा शोध घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे कार्य 'पुढारी'ने केल्याची भावना व्यक्त केली. कामगार चळवळीत कार्यरत असताना केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये मराठी टक्का कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हे चित्र बदलण्यासाठी भरतीप्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी लढा उभारणे गरजेचे असून, त्याकरिता युवकांनी एकत्रित येत काम करावे, असे आवाहन गोडसे यांनी केले.

युवाशक्तीत चमत्काराची क्षमता : बर्डे
आदिवासी बहुल दिंडोरी तालुक्यात कार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, हीच संधी मानत समाजाचे हित एकाच ध्येयाने कार्य करतो आहे. या कार्याला 'पुढारी'ने दिलेली शाबासकीची थाप ही नवचैतना निर्माण करणारी असल्याचे योगेश बर्डे यांनी सांगितले. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत युवकांनी ३० वर्षांनी सत्तांतर घडवून आणल्याची आठवण सांगताना युवाशक्तीत चमत्कार घडविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

महिलांनी राजकारणात यावे : हिरे
आजच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राजकारणातही महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू केले. त्यामुळे महिलांनी आता राजकारणात यावे, असे आवाहन रश्मी हिरे-बेंडाळे यांनी केले. समाजाप्रति काही करावे या भावनेने शांत बसू न दिल्याने पुण्यातील मल्टिनॅशनल कंपनीचा जॉब सोडून नाशिकला परतल्याची आठवण सांगताना जीवनात आई-वडील आपला आदर्श असल्याची भावना हिरे यांनी बोलून दाखविली.

अन‌् आठवणींना उजाळा… (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)
– श्याम गोहाड यांनी भावना व्यक्त करताना ज्युनिअर केजी ते विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांशी निगडित प्रश्नांवर आंदोलनांमधून घडत गेल्याची आठवण सांगितली. काेराेनामध्ये रुग्णांना औषधी, ऑक्सिजन पुरविल्याचे सांगताना त्यावेळी प्रशासनाची मदत लाभल्याची ते म्हणाले.
– नितीन सातपुते यांनी मनोगतात १० वर्षांपासून दिंडीतील वारकऱ्यांच्या समस्यांवर काम करत आहे. लॉकडाऊनमध्ये देशात सर्वप्रथम आपल्या गावातील जनतेला माेफत भाजीपाला वाटप केल्याची आठवण त्यांनी सांगितली.
– इरफान सय्यद यांनी सामाजिक कार्याची आवड असल्याचे सांगताना कोरोनात गरजू-गोरगरिबांना सॅनिटायझर, किराणा साहित्याचे वाटप केल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
– कैलास पाटील यांनी घरामध्येच सत्संग-प्रवचनाचा वारसा लाभला आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या घरातून मिळालेल्या शिकवणीनुसार जनतेची सेवा सुरू असल्याचे ते म्हणाले.
– पंकज खताळ यांनी खताळ फाउंडेशनने आजपर्यंत ४,२०० रुग्णांवर डोळ्यांची माेफत शस्त्रक्रिया, मोफत चष्मे व लेन्सेस वाटप केले. कोराेनात मनमाडमधील रुग्णांना दररोज २० ऑक्सिजन सिलिंडर वितरित केल्याची आठवण सांगितली.
– सोमनाथ पावशे यांनी आपणही समाजाचे देणे लाभतो ही भावना जोपासली. त्यातून मुलींसाठी अभ्यासिका, ज्येष्ठांसाठी नियमित आरोग्य शिबिराचे आयोजन करतो. यातून समाधान लाभत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news