Yuva Pudhari 2024 : परिपक्व लोकशाहीसाठी कर्तव्यभावना गरजेची : तांबे | पुढारी

Yuva Pudhari 2024 : परिपक्व लोकशाहीसाठी कर्तव्यभावना गरजेची : तांबे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश असल्याचे आपण अभिमानाने सांगतो. मात्र, आपली लोकशाही जगातील सर्वात परिपक्व लोकशाही नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे. भारताच्या तुलनेत अमेरिका आणि त्याहीपेक्षा छोट्या राष्ट्रांमध्ये लोकशाही अधिक प्रगल्भ आहे. परिपक्व लोकशाहीमध्ये कर्तव्यभावना गरजेची आहे. मतदारांनी मतदानाप्रति आणि लोकप्रतिनिधींनी मतदारांप्रति कर्तव्यभावना जपली तरच देशाची वाटचाल परिपक्व लोकशाहीच्या दिशेने होईल, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)

दैनिक ‘पुढारी’च्या (Dainik Pudhari) वतीने आयोजित ‘युवा पुढारी २०२४’ सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या युवानेत्यांना या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘युवा पुढारी २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजाप्रति आपल्या दायित्वाची कर्तव्यपूर्ती करणाऱ्या या युवा पुढारींच्या पाठीवर पुरस्काररूपी कौतुकाची थाप दिली गेली. यावेळी या उपक्रमाबद्दल दैनिक पुढारी (Dainik Pudhari) परिवारावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना हा उपक्रम युवापिढीला प्रेरणादायी असल्याचे आ. तांबे यांनी सांगितले. आपल्या चांगल्या कार्याची कुणी दखल घ्यावी, हे समाजकारणातील प्रत्येकाला वाटत असते. विद्यार्थी चळवळीत काम करताना समाजमाध्यमांनी आपल्या कार्याची दखल घ्यावी, असे मलाही नेहमीच वाटे. दैनिक ‘पुढारी’चा (Dainik Pudhari) हा पुरस्कार अशा युवा नेतृत्वाला त्यांच्या कार्याची पावती देणारा आणि समाजाप्रति आपल्या दायित्वाच्या पूर्तीसाठी निश्चितच बळ देणारा आहे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले जाते. परंतु प्रोत्साहन देणारे हातही आपल्या भोवती असायला हवे. ही भावना दैनिक ‘पुढारी’ (Dainik Pudhari) परिवाराने सातत्याने जपली आहे, याबद्दल त्यांचे विशेष आभार, अशा शब्दांत तांबे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. समाजात अनेक प्रश्न आहेत. सर्वच प्रश्न एकाचवेळी सुटू शकत नाहीत. त्यामुळे समाजकारण, राजकारण करणाऱ्यांनी त्यातील काही प्रश्न निवडून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेटाने लढा द्यावा. काम पूर्ण झाल्याचे समाधान मिळणे हे समाजकारणात सर्वात महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपल्याला कामाचे समाधान मिळत नाही तोपर्यंत केलेल्या कामाचा आनंद आपण उपभोगू शकत नाही, असेही तांबे यांनी सांगितले. नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याच्या सरकारच्या नव्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शविला. रेल्वेमार्ग बदलल्यास शिंदे, संगमनेर, नारायणगाव, राजगुरूनगर आदी भागाला रेल्वेचा काहीही उपयोग होणार नाही. याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)

सुमारे दोन तास रंगलेल्या या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, दीपक चंदे यांचेही भाषण झाले. पुरस्कारार्थींच्या वतीने जगदीश गोडसे, योगेश बर्डे व रश्मी हिरे-बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी प्रास्तविकात या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. समाजप्रबोधनाचा वारसा चालविताना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून समाजमनातील स्पंदन दैनिक पुढारीने कायम जपले असल्याचे नमूद करत समाजाप्रति कर्तव्यभावना जपणाऱ्या युवा नेतृत्वांचा हा सन्मान सोहळा असल्याचे सजगुरे यांनी सांगतिले. ॲड. अभिजित साबळे यांनी सूत्रसंचालन केले. दैनिक पुढारीचे उत्तर महाराष्ट्र युनिट हेड राजेश पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (Yuva Pudhari Sanman Sohala – 2024)

विकसित राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान महत्त्वाचे : मित्तल
कुठल्याही राष्ट्राच्या उभारणीत युवाशक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. सामाजिक जाणीवेतून राष्ट्रनिर्मितीला हातभार लागत असतो. भारत देश विकसित राष्ट्र बनण्यासाठी युवकांचे योगदाने महत्त्वाचे आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केले. देशाच्या उन्नतीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. युवकांचा सहभाग त्यात मोलाचा ठरावा. यासाठी युवकांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. दैनिक पुढारीचा ‘युवा पुढारी’ पुरस्कार युवा नेतृत्वाला प्रेरणादायी आहे. दैनिक पुढारीची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे, असेही मित्तल यांनी यावेळी सांगितले.

सशक्त भारतासाठी युवाशक्तीचे महत्त्व: चंदे
सशक्त आणि सक्षम भारत निर्मितीत युवाशक्तीचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे अध्यक्ष दीपक चंदे यांनी केले. नाशिकमध्ये आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या ‘पुढारी’ची नाशिककरांशी घट्ट नाळ जुळली आहे. सामान्यांच्या प्रश्नांचा बुलंद आवाज म्हणून आज ‘पुढारी’ (Dainik Pudhari) नाशिक जिल्ह्यात नावारूपाला आला आहे. आज गावगाड्याच्या विकासात ‘पुढारी’ महत्त्वाचे योगदान देत आहे. देशाचा युवा महोत्सव नुकताच नाशिकमध्ये झाला. विविधतेत एकतेचे दर्शन यानिमित्ताने ‘याचि देही, याची डोळा’ सर्वांनी घेतले. युवा पुढारी हा उपक्रमही विविधतेत एकता निर्माण करणारा आहे, असेही चंदे यांनी सांगितले.

यांचा झाला सन्मान…
अजित अंबादास कड (दिंडोरी), अनिल साहेबराव सोनवणे (नांदगाव), बबनराव शंकर जगताप (सिन्नर), देवा पांडुरंग सांगळे (सिन्नर), ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड (नाशिक), इरफान सय्यद (निफाड), जगदीश निवृत्ती पांगारकर (सिन्नर), जगदीश दत्तात्रय गोडसे (सटाणा), कैलास त्र्यंबक पाटील (नाशिक), करण हेमंत गायकवाड (नाशिक), नवनाथ सोमवंशी (पिंपरखेड, नांदगाव), नितीन विष्णू सातपुते (नाशिक), पंकज रामचंद्र खताळ-पाटील (मनमाड), प्रशांत प्रकाशराव कड (दिंडोरी), प्रिया केशव सांगळे (सिन्नर), राहुल अरुण पवार (नाशिक), राजेश प्रकाश गांगुर्डे (नाशिक), रश्मी हिरे-बेंडाळे (नाशिक), रतन राजलदास चावला (नाशिक), रुपाली अनिल पठारे (नाशिक), संजय पुंडलिक तुंगार (नाशिक), श्याम प्रकाश गोहाड (नाशिक), कल्पेश रमेश कांडेकर (नाशिक), सोमनाथ कारभारी पावशे (सिन्नर), सुनील प्रकाश पाटील (नाशिक), वैभव भगवान गांगुर्डे (सटाणा), विकास देवराम भुजाडे (चांदवड), विनोद अरुण दळवी (नाशिक), योगेश माधवराव बर्डे (दिंडोरी), योगेश भिवाजी आव्हाड (सिन्नर), योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर (नाशिक).

Back to top button