पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला (YS Sharmila) काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्या ४ जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वायएस शर्मिला या वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक आणि अध्यक्षा देखील आहेत. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून भारत राष्ट्र समितीचे (BRS) वर्चस्व संपुष्टात आणले. यानंतर आता ही घडामोड समोर आली आहे.
दरम्यान, वायएस शर्मिला यांनी आज सकाळी पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. ज्यात पक्ष विलीनीकरण आणि भविष्यातील राजकीय भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तेलंगणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी वायएस शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना फायदा होऊ शकणाऱ्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी त्यांनी तेलंगणात निवडणूक लढविण्यासही नकार दिला होता. "मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहे. कारण तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयाची संधी आहे," असे त्यांनी म्हटले होते.
"केसीआर यांनी त्यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही आणि यामुळे केसीआर पुन्हा सत्तेत येऊ नयेत असे मला वाटते. मी वायएसआर यांची मुलगी या नात्याने काँग्रेसला पाठिंबा देत आहे. ५५ हून अधिक मतदारसंघांमध्ये मी काँग्रेसच्या व्होट बँकेवर परिणाम करणार आहे, असे वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी सांगितले होते.
हे ही वाचा :