पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणात मुसळधार पाऊस सुरू असून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. नांदेड- शिवणे पुलावरून मंगळवारी (दि.13) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दोन तरुण पाण्यातून वाहून गेले होते. त्यापैकी एक तरुण बचावला असून, दुसर्या तरुणाचा मृतदेह वारजे येथील दांगट पाटील नगर परिसरात मिळून आला आहे.
निखील निरजकुमार कौशिक (वय.25,रा. नांदेड सिटी, मुळ. गाजीयाबाद ) असे तरुणाचे नाव आहे. निखील हा शहरातील एका आयटी कंपनतीत काम करत होता. तर आशिष देवीदास राठोड ( रा. नांदेड सिटी, मुळ. अकोला) याने पुलाच्या कठड्याला घट्ट धरून ठेवल्याने तो बचावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील आणि आशिष हे दोघे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास रिक्षातून आले होते. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने नांदेड-शिवणे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रिक्षावाल्याने त्यांना अलीकडेच सोडले. पुल ओलांडत असताना पाण्याचा प्रवाहात निखिल आणि आशिष वाहून जात होते. त्या वेळी आशिषने पुलाच्या खांबाला घट्ट पकडून ठेवल्याने तो बचावला.
शिवणे गावातील रहिवासी विद्याधर दळवी, महेश कांबळे, राज वाल्मिकी यांनी दोर टाकून आशिषला बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाकडून वाहून गेलेल्या निखीलचा शोध घेत होते. त्यावेळी वारजे येथील दांगट पाटील नगर परिसरातील नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह मिळून आला. त्याची ओळख पटविली असता, तो निखील असल्याचे समोर आले. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापूरकर यांनी दिली.