पुढारी ऑनलाईन डेस्क : अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाला अंडर-19 टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणारी हरियाणाची धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मा (Shafali Verma) डब्ल्यूपीएलच्या लिलावात कोट्यधीश बनली आहे. 50 लाखांची बेस प्राईज असणा-या खेळाडूला तब्बल दोन कोटी रुपयांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. आता महिला प्रीमियर लीगमध्ये शेफालीची बॅट दिल्ली संघाकडून तळपताना दिसणार आहे.
19 वर्षीय शेफालीने अगदी लहान वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेफालीने धमाकेदार कामगिरी करून क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. महिला क्रिकेटमधील वीरेंद्र सेहवाग मानल्या जाणाऱ्या शेफालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करून जेतेपद मिळवले.
हरियाणातील रोहतक येथे राहणा-या शेफालीचा (Shafali Verma) जन्म 28 जानेवारी 2004 रोजी झाला. शेफालीने मुलांसोबत क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये, तिने आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी ती जगातील सर्वात तरुण खेळाडू बनली.
19 वर्षांच्या शेफालीने (Shafali Verma) तिच्या 4 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 2 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 52 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान, तिने कसोटीत 60.50 च्या सरासरीने 242 धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये 26.55 च्या सरासरीने 531 धावा आणि 52 टी-20 मध्ये 24.78 च्या सरासरीने 1264 धावा केल्या आहेत. तिने टी-20 मध्ये 5 अर्धशतके झळकावली आहेत. तिची सर्वोच्च धावसंख्या 73 आहे.