पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल 'आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ' ठरला आहे. त्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडच्या ड्वेन कॉनवेला मागे टाकत हा किताब आपल्या नावावर केला. गिलने जानेवारी महिन्यात दमदार कामगिरी केली. त्याने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले. तर टी-20 क्रिकेटमध्येही शतकी खेळी साकारून शानदार प्रदर्शन केले. या दमदार कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आणि जानेवारी महिन्यातील उत्कृष्ट खेळाडून म्हणून गिलचा गौरव केला.
गिलशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ड्वेन कॉनवे प्लेअर ऑफ द मंथ बनण्याच्या शर्यतीत होते. गिलने २०२३ च्या सुरुवातीलाच दमदार कामगिरी केली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. या सामन्यात तो केवळ ७ धावा करु शकला. यानंतर पुण्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याला दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. राजकोटमध्ये मात्र त्याने ४६ धावांची खेळी केली.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शुभमनला फॉर्म गवसला. त्याने तीन एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे ७०, २१ आणि ११६ धावांची खेळी केली. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शुभमनने तुफान फटकेबाजी केली. हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने १४९ चेंडूमध्ये २०८ धावांची खेळी केली. या सामन्यात गिल शिवाय इतर कोणताही फलंदाज जास्त धावा काढू शकला नाही.