जागतिक जलदिन विशेष : येथे पाणी भरण्‍यासाठी केले जाते लग्‍न! जाणून घ्‍या शहापूरातील ‘पाणीवाली बाई’ची व्‍यथा…

संपूर्ण मुंबईला पाणी देणाऱ्या शहापुर तालुक्‍यातील आदिवासी पाडे आजही तहानलेलेच आहेत. 
(फाईल फोटो : समीर चव्‍हाण )
संपूर्ण मुंबईला पाणी देणाऱ्या शहापुर तालुक्‍यातील आदिवासी पाडे आजही तहानलेलेच आहेत. (फाईल फोटो : समीर चव्‍हाण )
भाग्यश्री प्रधान-आचार्य : डोंबिवली 

'अग ए बाय जा पानी भरायला. इथ घरात पान्याचा थेंब नाही आणि अंगणनात काय खेलतेस.. लगीन झाल्यावर पानीच भरायचय', असे एक मावशी आपल्या लहानग्या दहा वर्षाच्या मुलीला सांगत होती. आम्ही शहापूर जवळील एका पाड्यावर पोहचताच क्षणी माय लेकींचा हा संवाद कानी पडला. चक्क ही दहा वर्षांची पोर डोक्यावर दोन हांडे आणि हातात दोन हांडे घेऊन दूर कोसावर पाणी भरायला निघाली. इतकेच नव्हे तर केवळ पाणी भरण्यासाठी कितीतरी जोडप्यांनी दोन लग्न केल्याचे आदिवासी पाड्यावर दिसून आले. संपूर्ण मुंबईला पाणी देणाऱ्या शहापुर तालुक्‍यातील आदिवासी पाडे आजही तहानलेलेच आहेत. आज जागतिक जलदिनानिमित्त जाणून घेवूया येथील महिलांची व्‍यथा.

पाण्‍यासाठी आदिवासी महिलांची वणवण …

तीव्र पाणी टंचाईच्‍या काळात शहापूर तालुक्‍यातील आदिवसाी पाड्यावर असे चित्र असते. ( फाईल फोटो )
तीव्र पाणी टंचाईच्‍या काळात शहापूर तालुक्‍यातील आदिवसाी पाड्यावर असे चित्र असते. ( फाईल फोटो )

धरण उशाला आणि कोरड घशाला अशी येथील परिस्थिती. आजूबाजूच्या परिसरात मध्य वैतरणा, तानसा, भातसा अशी मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी आणि अनेक छोटी छोटी धरणे आहेत. मात्र शहापूर, कसारा या भागातील नागरिकांना कायमच पाण्याच्या शोधात वणवण करावी लागते. एक थेंब पाण्यासाठी देखील महिलांना मोठा संघर्ष करावा लागतो. पाण्यामुळे या भागातील आदिवासी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा सर्वच चक्रात गुंतून पडल्याचे त्यांच्याशी बोलताना लक्षात आले.

पाण्‍याच्‍या प्रत्‍येक थेंबासाठी संघर्ष

यावेळी येथील महिलांशी आणीन्या परिसरात काम करणाऱ्या काही संस्थांशी 'पुढारी'च्या टीमने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी यशोदा (नाव बदलले आहे) मावशींनी सांगितलं काय करणार ग बाये तुमच्याकडे भरपूर पाणी आहे. आमच्याकडे पाण्‍याचा एक एक थेंब जमा करावा लागतो तेव्हा एक कळशी भरते. सगळ्यात जास्त पाण्याचा वापर महिलांनाच करावा लागतो ना. पुरुष मनस काय अंघोळ केली की चालले कामाला. अंघोळ, स्वयंपाक,कपडे, भांडी शिवाय पिण्यासाठी पाणी तर लागतेच ना. त्यात आमच्याकडे गुर आहेत त्यांना का आम्ही पाण्यावाचून ठेवणार, असा सवालही त्‍यांनी केला.

सरपंच सभेत वारंवार मागणी

फाईल फोटो
फाईल फोटो

दुसऱ्या पार्वती मावशी ( नाव बदलले आहे) त्या म्‍हणाल्‍या, " कितीवेळा सरपंचाच्या सभेत आम्ही मागणी केली आहे; पण काही उपयोग होय नाही. सरपंचाच्या सभेत आम्ही महिला जास्त जात नाही ना. पण यावेळी मी ठरवलं आहे सरपंचालाच जबाबदार धरायचे."

शीला आजी ( नाव बदललं आहे). अग बये मझ आयुष्य सरल पाणी भरण्यात. नवऱ्याकडून सुख मिळालं ना कोणती हाऊस मौज करता आली. सकाळी लवकर उठायचं आणि हांडे डोक्यावर घेऊन कोसभर चालत जाऊन पाणी भरायच अशा दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन तरी फेऱ्या मारायचा म्हणजे दिवसभरात पुरेल इतके पाणी मिळते. थकून गेलं शरीर पाणी भरून अस सांगताना त्या गाहिवरल्या होत्या. अग एक बाई पाणी भरून थकली की दुसरी बायको अशी चार लग्न त्‍यांनी केल्‍या, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

तिसव्‍या वर्षीच महिला अनेक दुखण्‍यांनी त्रस्‍त

फाईल फोटो.
फाईल फोटो.

१५ ते १६ या वयात होणारी लग्न आणि त्यानंतर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन ठेपली की तिसाव्या वर्षी मान, कंबर, पाठ दुःखी सुरू होते. त्यातच वर्षभराच्या अंतरात होणारी तीन ते चार मुलं या सगळ्यात आम्ही थकून जातो; मग आम्ही थकलो तर घरात पाणी कोण भरून आणेल आणि लहानग्यांना कोण सांभाळेल अशी परिस्थिती होते ग. कोणालाही चार बायका करायची हौस नाही हो असे पाड्यावरील वनिता ( नाव बदलले आहे) सांगत होती.

बोरींग हापसले तरी पाणी येत नाही

फाईल फोटो.
फाईल फोटो.

विठा आजी ( नाव बदलले आहे). काही वर्षांपूर्वी इतकी परिस्थितीत नव्हती असे सांगताना आता बोरींगला हापसले तरी पाणी येत नाही, असे सांगताना सरकारी अधिकारी जमिनीत इंजेक्शन मारतात आणि त्यांनतर पाणी येत नसल्याचे त्यांचे निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. धरण भरून वाहत आहेत; मग आम्हाला का पाण्यासाठी का वणवण करावी लागते ग? असा प्रश्न त्या विचारत होत्या. पाण्याच्या प्रश्नामुळे आमच्या समाजाच्या मुली शहापूर परिसरात लगीन करून यायला तयार होत नाहीत, असे मालाताईंनी सांगितले.

त्‍यांना का म्‍हटलं जातं 'पाणीवाली बाई'

या संदर्भात डोंबिवलीतील 'हेल्‍पिंग हॅण्ड' या संस्थेशी संपर्क साधला असता या संस्थेची अध्यक्षा प्रियांका हिने आम्ही या गावात काम करत असल्याचे सांगत सगळ्या गोष्टींना दुजोरा दिला. ती ज्या पाड्यावर काम करते तो पाडा शहपुर येथे आहे. हे संपूर्ण चक्र असल्याचं सांगत धरणात पाणी साठावे यासाठी जमिनीत इंजेक्शन दिले जाते. यामुळे जमिनीत जो पाझर फुटतो तो थेट धरणाच्या पाणी क्षमतेत वाढ करत असल्याचे तिने सांगितले. अजूनही सावकारी पद्धत असून पहिली बायको थकली की कर्जातून मुक्ती मिळेल, असे सांगत कर्जदाराच्या मुलीला मागणी घातली जाते. लग्ना तिची कोणती हौस पुरवली जात नाही. या मुलीने केवळ पाणी भरण्याचे काम करतात म्हणून त्यांना "पाणीवाली बाई" म्हणून संबोधले जाते, असे देखील तिने नमूद केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news