World Heart Day : गोव्यात हृदयविकारामुळे दरदिवशी सरासरी 12 जणांचा मृत्यू

World Heart Day : गोव्यात हृदयविकारामुळे दरदिवशी सरासरी 12 जणांचा मृत्यू

पणजी :  राज्यात हृदयविकारामुळे दरदिवशी सरासरी 12 मृत्यूंची नोंद होत आहे. कोरोनानंतर मानवी ताण वाढला आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्याचा प्रमुख परिमाण माणसाच्या हृदयावर होत आहे. दरवर्षी 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि हृदयविकारांच्या प्रतिबंध, उपचार आणि व्यवस्थापन व उपाययोजना यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. दिवसेंदिवस वाढणार्‍या हृदयविकाराला बदलती जीवनशैली, अयोग्य आहार तसेच बदलत चाललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी ही मुख्य कारणे ठरत आहेत. (World Heart Day)

राज्यातील अनेक हृदयरोग तज्ज्ञांच्या मते उत्तम निरामय दीर्घायुष्यासाठी हृदयाची काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याच्या काळात ऋतूनुसार फळे, भाज्या राहिलेल्या नसून, प्रत्येक ऋतूत रसायनयुक्त फळे आणि भाज्या बाजारात उपलब्ध आहेत. त्याचादेखील माणसाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

दरम्यान, सरकारने जारी केलेल्या अहवालातून हृदयविकाराच्या समस्यांमुळे राज्यात दिवसाला सरासरी 12 मृत्यूंची नोंद करण्यात येत आहे. 2017 ते 2021 च्या कालावधीत हृदयविकाराने एकूण 22 हजार 584 मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात 12 हजार 16 पुरुष 10 हजार 568 महिलांचा समावेश आहे. राज्यात आरोग्य क्षेत्रात प्रगती होत असली तरी हृदयविकार झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची वाढती संख्या चिंताजनक आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागात 6 हजार 313, तर ग्रामीण भागात 16 हजार 275 मृत्यू झालेले आहेत. 2021 मध्ये हृदयविकारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही कमालीची चिता निर्माण करणारी आहे. (World Heart Day)

तरुण पिढीमध्ये वाढतोय हृदयविकार

तरुण पिढीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्याला कारण म्हणजे शारीरिक श्रम कमी आणि मानसिक चिंता जास्त, अवेळी खाणे, बाहेरचे चरबीयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश, मद्यप्राशन, सिगारेट, तंबाखू, गुटखा याचे सेवन. रात्रभर जागरण करत मोबाईल, टीव्ही पाहणे व दिवसभर झोप काढणे हेसुद्धा कालांतराने हृदयविकाराचे रोग होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी दिनचर्या सांभाळणे, वेळेत उठणे ,वेळेत झोपणे, किमान अर्धा तास व्यायाम करणे आणि ऋतूनुसार आलेल्या भाज्या, फळे यांचे सेवन करणे हे हृदयविकार टाळण्यासाठी उत्तम आहे, असे आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. आदित्य बर्वे यांनी सांगितले.  (World Heart Day)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news