बांदा; पुढारी वृत्तसेवा
व्हेल माशाच्या उलटीला भारतात व्यापार करण्यासाठी बंदी आहे. तरीही गोवा राज्यातून तस्करी साठी आणलेली व्हेल माशाची सुमारे ५ किलो २३२ ग्रॅम वजनाची उलटी (ॲम्बरग्रीस) सिंधुदूर्ग पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गांधी चौक येथे जप्त केली. बाजारात त्यांची सुमारे ५ कोटी ३२ लाख २० हजार रुपये इतकी किंमत आहे.
याप्रकरणी गोवा येथील कॉन्स्टंटटिनो फिलोमेनो फर्नांडिस (वय ४५, रा. सालसेत, मडगाव, गोवा), जुजू जोस फेरीस (वय ४०, रा. सालसेत, मडगाव, गोवा) आणि तनिष उदय राऊत (वय१७, लंगरबाग तोरसे, पेडणे-गोवा) या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई आहे.
याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांना अॅम्बरग्रीसचि (व्हेल माशाची उलटी) तस्करी होणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार सपोनि महेंद्र घाग आणि उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्यानुसार सायंकाळी चारच्या सुमारास जीए ०८ एम ५०५५ या क्रमाकांच्या वाहनाबाबत संशय आला. आणि त्याची झडती घेतली असता त्यामध्ये माशाची उलटी आढळून आली नाही.
यानंतर पोलीसांनी वाहनातील गाडीतील दोघांना ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता, त्यांनी ती उलटी आपल्याकडे नसून तनिष राऊत याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी त्या दोघांकरवी तनिषला फोन करून बांदा येथे बोलावून घेतले.
काही वेळानंतर तो दुचाकी क्रमांक जीए ०३ क्यू ०५४९ वरून आला. येताना त्याने पिशवीतून आणलेला प्लास्टिक कव्हर मध्ये गुंडाळून ठेवलेला सुगंधी पदार्थ आढळून आला. तो पदार्थ व्हेल माशाची उलटी आहे की नाही हे तपासण्यासाठी उपवनसंरक्षक एस नारनवर यांना बोलवण्यात आले. त्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत ते अंबरग्रीसच असल्याची पुष्टी झाली.
सदर कारवाईप्रमाणे तिन्ही संशयित आरोपीना ताब्यात घेत वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९ (ब) ५१, ५७ प्रमाणे बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग नितीन बगाटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, एलसीबी चे सपोनि महेंद्र घाग, पोउनि सचिन शेळके, अनिल धुरी, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, चंद्रकांत पालकर, ज्ञानेश्वर कांदळगांवकर, प्रथमेश गावडे यांनी केली आहे. तर वनविभागातील मा. उपवनसंरक्षक शहाजी नारनवर, वनरक्षक डी.बी.शिंदे, वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन शिरसागर, वनपाल अनिल मेस्त्री, प्रमोद राणे, शशिकांत देसाई, प्रविण पाटील यांचाही सहभाग होता.
व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी
व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. व्हेल माशाच्या उलटीमध्ये अल्कोहोल असते. परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या व्हेल माशाच्या उलट्यांचा वापर करतात. त्यामुळे परफ्यूमचा सुगंध बराच काळ टिकतो.
दरम्यान ही व्हेल माशांची विष्ठा आहे की उलटी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ताजे असताना त्याला विष्ठेसारखा वास येतो. हळूहळू ते मातीसारखे होऊ लागते. मग पाण्यात राहिल्याने ते थंड होऊन खडकासारखे दिसू लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे. ते मिळवण्यासाठी काही लोक अवैधरित्या व्हेल माशांची शिकार करून त्याची तस्करी करतात. व्हेल प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याची शिकार करणे किंवा त्याच्या भागांचा व्यापार करणे बेकायदेशीर आहे.
हेही वाचा