मुंबई; पुढारी ऑनलाईन
राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार आहे. याबाबत मुख्यमंत्री आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोना स्थिती नेमकी कशी आहे याची माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मास्कसक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मास्कसक्ती करावी की नाही. यावर चर्चा झाली आहे. राज्यात दररोज २५ हजारांपर्यंत चाचण्या करत आहोत. लसीकरण वाढवले जात आहे. जीनोम सिक्वेसिंग करायला सांगितले जात आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र सेफ झोनमध्ये आहे. राज्यात प्रति १० लाखांमध्ये ७ केसेस आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.
६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण आता होणार आहे. पण याबाबत केंद्राकडून सविस्तर नियम आलेले नाही. पण त्याची राज्यात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करु, असेही ते म्हणाले. तसेच १२ ते १५ आणि १५ ते १७ वयोगटातील लसीकरण कमी असून ते जाणीवपूर्वक लक्ष ठेवून वाढवावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोनास्थितीसंबंधी चर्चा केली. गेल्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोनासंबंधी केलेल्या एकत्रित कामगिरीबद्दल बैठकीतून पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान म्हणाले, कोरोनासंबंधी ही २४ वी बैठक आहे. कोरोनाकाळात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित केलेल्या कार्याने कोरोनाविरोधातील युद्धात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. कोरोनाचे आव्हान अद्यापही संपुष्टात आलेले नाही आणि धोकाही टळलेला नाही. ओमायक्रॉन तसेच त्याचे सबव्हेरियंट गंभीर स्थिती निर्माण करू शकतात, हे यूरोप देशातील स्थितीवरून दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
भारताचे वैज्ञानिक आणि विशेतज्ज्ञ जागतिक स्थितीसह देशातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अशात त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे सामूहिक दृष्टिकोणातून पालन आवश्यक आहे. अगोदरपासून आतापर्यंत संसर्गाला सुरूवातीच्या काळात रोखण्याला प्राथमिकता देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
अनेक दिवसांनी शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पालकांच्या मनातील चिंता वाढली आहे. लहान मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त अनेक ठिकाणांवरून समोर येत आहेत. पंरतु, बालकांना कोरोना लसीचे सुरक्षाकवच मिळत असल्याची बाब समाधानकारक आहे. उद्या पासून ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाचे शाळांमध्ये यासंबंधी विशेष अभियान राबवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.
बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, प्रतिनिधी उपस्थित होते.
हे ही वाचा :