‘त्यांची चाल समजली नाही’ : २०१९ला राज्याची सत्ता का गमावली? फडणवीसांनीच सांगितले कारण

‘त्यांची चाल समजली नाही’ : २०१९ला राज्याची सत्ता का गमावली? फडणवीसांनीच सांगितले कारण
Published on
Updated on

पुणे: पुढारी वृत्तसेवा

खेळ असो वा राजकारण त्यामध्ये माणसाने कधीही आत्मसंतुष्ट असू नये. 2019 मध्ये सत्तेच्या खेळात आम्हीच ग्रँडमास्टर होतो. सत्तेचा डाव देखील मांडला होता. परंतु, आम्ही समोरील खेळाडूची चाल समजू शकलो नाही, अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देत पहाटेच्या शपथविधी आठवण करुन दिली.

पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. याप्रसंगी क्रीडा मंत्री सुनील केदार, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष परिणय फुके, आमदार प्रसाद लाड, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक जैन, अनिरुध्द देशपांडे, बुध्दिबळपटू अभिजित कुंटे, निरंजन गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आम्ही राजकारणात अनेक चाली खेळत असतो. राजकारण आणि बुध्दिबळ यामध्ये आपले डोके शांत व कार्यक्षम असणे गरजेचे आहे. दोन्हीकडे माणसाने कधीही आत्मसंतुष्ट होऊ नये. समोरील खेळाडू काय चाल खेळू शकतो याचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. खेळाडूकडे खिलाडूवृत्ती असणे आवश्यक आहे, त्यामुळेच तो खेळात आणि आयुष्यात पुढे जाऊ शकतो.

क्रीडा मंत्री केदार म्हणाले, बुध्दिबळ आणि राजकारणात आपल्याला समोरील खेळाडूच्या डोक्याचा अभ्यास करता येणे गरजेचे आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच भागातील असल्याने अनेक खेळ आम्ही नागपूर महानगरपालिकेत देखील एकत्र खेळलो आहोत. आम्ही 2019 मध्ये समोरच्याचा अभ्यास केल्यानेच आम्ही सत्तेत आलो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दोन वर्ष कोरोना संकट काळामध्ये सर्व थांबले असताना गाडी आता कुठे रुळावर येत आहे. आता 4-5 महिन्यात आम्ही चांगल्या स्पर्धा घेतल्या आहेत. खेलो इंडियासाठी महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर उत्तम पध्दतीने चालु असून या स्पर्धेमुळे युवकांना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. याचा फायदा खेळाडू करून घेतील, असा विश्वास केदार यांनी यावेळी व्यक्‍त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिणय फुके यांनी तर निरंजन गोडबोले यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news